नवी मुंबई : शिक्षिकेने डस्टर मारल्यामुळे घाबरलेल्या केजीच्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. नवी मुंबईतील घणसोलीमधल्या एएसपी कॉन्व्हेंट स्कूलच्या ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुरड्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घणसोली सेक्टर 9 मध्ये असलेल्या एएसपी कॉन्व्हेंट हायस्कूलच्या ज्युनिअर केजीमध्ये साडेचार वर्षांचा नक्ष मढवी शिकतो. 4 जुलै रोजी शाळेत बेंचवरुन उठला म्हणून शिक्षिकेने त्याच्या गालावर हाताने, तर कपाळ आणि पाठीवर डस्टरने मारलं आणि दम दिला. या प्रकारामुळे चिमुरडा नक्ष चांगलाच घाबरला.
शाळा सुटल्यावर नक्ष बाहेर न आल्याने त्याच्या आईने वर्गशिक्षिकेला विचारलं. तेव्हा वर्गशिक्षिकेने त्याला बरं नसल्याचं सांगत आईच्या हवाली केलं. पण नेहमी हसत-खेळत उड्या मारत येणारा नक्ष आज काही बोलत नाही, त्याचं अंगही तापलं होतं. त्यामुळे आईने नक्षला थेट डॉक्टरांकडे नेलं. त्याला 104 ताप आला होता.
त्याला अनेकदा विचारल्यानंतर त्याने खुणेने शिक्षिकेने मारल्याचं सांगितलं. तेव्हापासून नक्ष फारसं बोलत नाही. शाळेचा विषय काढला की घाबरतो. सुरुवातीला तो आई-वडिलांनाही ओळखत नव्हता, असा दावा केला जात आहे.
वर्गशिक्षिकेच्या या माराचा नक्षच्या नाजूक मनावर गंभीर परिणाम झाला असल्याचं म्हटलं जात आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न नक्षचे पालक करत आहेत. त्यांनी संबंधित वर्गशिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेले तीन दिवस नक्ष रुग्णालयात दाखल आहे. रबाळे पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.