बीड : जिल्ह्यात साजरा करण्यात आलेल्या एका वाढदिवसाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे. बीडमधील एका भीक मागणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्याला शुभेच्छा देण्यात आलेले पोस्टर संपूर्ण शहरभर झळकले आहेत. वाढदिवसापोटी लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या नेत्यांना आळा बसावा म्हणून युवकांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. 


राजकीय नेत्यांचे, पुढाऱ्यांचे, आमदार-खासदारांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे झालेले पाहिले असतील. मात्र बीडच्या माजलगावमध्ये एका भिक मागणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस काही तरुणांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.  


सध्या सगळीकडेच अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचं फॅड सुरू आहे. कधी जेसीबीतून फुलांची उधळण तर कधी तलवारीने केक कापणे. एवढंच नाही तर वाढदिवसाच्या नावाने लाखोंची उधळपट्टी करायची. याचा निषेध करण्यासाठी तरुणांनी एकत्र येत चक्क एका भीक मागणाऱ्या व्यक्तीचे शहरात पोस्टर लावले आहेत. एवढेच नाही तर रात्री डीजे लावून जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. भिक मागणाऱ्या व्यक्तीच्या वाढदिवसाचे शहरात बॅनर लावून भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.


या भिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जमलेली संख्या पाहून हा वाढदिवस एखाद्या भिकाऱ्याचा आहे असे कोणालाच वाटणार नाही. सेलिब्रेशनसाठी लावण्यात आलेल्या डीजेच्या तालावर सहभागी झालेले सर्वजण तल्लीन होऊन नाचत आहेत. एवढेच नाही तर सर्वांनी फेटे घालून या भीक मागणाऱ्या व्यक्तिचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला आहे. शहरातील मोठ-मोठे लोक या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले आहेत. 


या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सोबतच वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांचे कौतुक होत आहे. 


महत्वाच्या बातम्या