Corona Death Beed Maharashtra :  कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयाची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. ही मदत देण्यासाठी शासनाकडून मृत व्यक्तींच्या नावाची खातरजमा करणे सुरू आहे. याच कामांमध्ये अंबाजोगाई शहरात चक्क 216 जिवंत माणसांचा समावेश हा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या यादीत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.


यापूर्वीच अनेक कोरोना मृतांची नाव शासनाच्या पोर्टलला नोंदवण्यात आली नसल्याचे उघड झाले होते. आता मात्र जिवंत व्यक्तीचे नाव नोंदवले गेल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. 


कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची जमवाजमव करायचे काम शासन स्तरावर सुरू आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची माहिती हे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या पोर्टलवर  उपलब्ध आहे.


मात्र याच पोर्टलवर असलेल्या मृत व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त नावं ही महसूल विभागाच्या हातात पडलेल्या यादीत आहेत. त्याचं झालं असं की अंबाजोगाई तहसीलदारांकडे कोरोनामुळे मृत झालेल्या 532 व्यक्तींच्या नावाची यादी आली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या नावाची खातरजमा करण्यासाठी या मृत व्यक्तींच्या घरी चौकशी केली. 


नागनाथ वारद यांच्याकडे कर्मचाऱ्याने जाऊन तुमच्या घरातील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांची माहिती द्या असे सांगितले. संतापजनक बाब ही होती की नागनाथ वारद यांच्याकडेच या कर्मचाऱ्यानं त्यांच्याच मृत्यूची खातरजमा करण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.


अंबाजोगाईच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या यादीमध्ये एकूण मृत व्यक्तींच्या नावाची नोंद ही 316 इतकी आहे. मात्र तहसीलदारांच्या हाती लागलेल्या यादीमध्ये मात्र एकूण 532 नावे आहेत. त्यामुळे ही वाढलेली 216 नावे आली कुठून आणि असा प्रश्न मात्र आता समोर आला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -