विधानसभा निकालाआधी मुख्यमंत्री केदारनाथांच्या चरणी
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2019 08:48 PM (IST)
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर सपत्नीक केदारनाथला जाऊन दर्शन घेतले आणि तेथे धार्मिक विधी पूर्ण केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सकाळी केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. सकाळी त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः टि्वट करत याची माहिती दिली. आज सकाळी केदारनाथचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. ‘हर हर महादेव’ असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केदारनाथला जाऊन पूजा आणि ध्यान-धारणा केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर सपत्नीक केदारनाथला जाऊन दर्शन घेतले आणि तेथे धार्मिक विधी पूर्ण केले. विधानसभा निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून प्रचारात व्यस्त होते. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर पुन्हा प्रचारसभेसाठी ते राज्यात फिरले.