मुंबई : गेली चार वर्षे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार रुपये अग्रिम देण्यात आला आहे. एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये आणि अधिकाऱ्यांना 5,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे.
आचारसंहिता असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
यासंदर्भात एसटीच्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने रावते यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र आणि राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी माहे ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचाऱ्यांना आनंदाची होणार आहे.
दिवाळीच्या जादा वाहतूकीसाठी एस.टी. सज्ज
दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळातर्फे 24 ऑक्टोंबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, दिवाकर रावते यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2019 05:58 PM (IST)
केंद्र आणि राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी माहे ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -