बीड : बदली झाली म्हणून पोलिस स्टेशनच्या सहकाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून ज्या पोलिस कर्मचाऱ्याला निरोप समारंभामध्ये निरोप दिला. तोच पोलिस घरी जायला निघाला खरा पण ज्या रस्त्यावरून निघाला त्याच रस्त्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मनाला चटका लावणारी घटना बीड शहराजवळच्या खजाना विहिरीजवळ घडली.

Continues below advertisement


महेश आधटराव हे नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल होते. सध्या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बदल्या चालू आहेत. महेश आधटराव यांची सुद्धा प्रशासकीय बदली गेवराईला झाली होती. यासाठीच त्यांना काल नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये सहकारी नागरिक आणि पत्रकारांनी मिळून निरोप समारंभ ठेवला होता.


महेश आधटराव यांनी अल्पावधीत नेकनूर परिसरामध्ये आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती आणि म्हणूनच ज्या वेळी आधटराव यांची बदली गेवराईला झाल्याचे समजले त्यानंतर त्यांना सर्वांनी मिळून पोलीस स्टेशनमध्ये निरोप दिला. खूप कमी पोलीस कर्मचारी असतील ज्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने निरोप समारंभ बदलीनंतर मिळाले असतील, पण हाच निरोप समारंभ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा समारंभ ठरला.


नेकनूर येथील पोलीस ठाण्यात निरोपाचा कार्यक्रम आटोपून महेश आधटराव स्वतःच्या स्विफ्ट कारने बीड कडे निघाले होते. घराकडे येत असताना खजाना विहीर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला. कार डिव्हाईडर वरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नदीत कोसळली. यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. जखमी अवस्थेतच त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा अपघात झाल्यानंतरही अनेक जण जिल्हा रुग्णालयांमध्ये येऊन चौकशी करत होते. मात्र उपचार चालू असतानाच महेश आधटराव यांचा मृत्यू झाला.


कर्तव्य बजावताना अनेक वेळा वेगवेगळ्या कारवाईत ते सहभागी झाले होते. मात्र त्याहीपेक्षा सामाजिक भान असलेला पोलीस अशी प्रतिमा महेश आधटराव यांनी निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वीच पावसाळ्याच्या सुरुवातीला लिंबागणेश येथे वादळी वाऱ्यात एका वृद्ध दाम्पत्याची झोपडी पडली. याच पोलीस दलात असलेले महेश आधटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः साहित्य आणून झोपडी उभा करून दिली. त्या दाम्पत्याला स्वखर्चाने नवे कपडे देखील घेऊन दिले होते. असे सामाजिक भान असलेल्या पोलिसाला आज बीड पोलीस दल मुकले आहे.