बीड : बीडमधील विवेक रहाडे या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येचा फायदा घेण्यासाठी त्याची बनावट सुसाईड नोट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उजेडात आला आहे. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन नमुन्यातून या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तपासले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं होतं
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने बुधवारी (30 सप्टेंबर) दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता.
चिठ्ठीतील मजकूर
“मी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे मजाह नीट परीक्षेत नंबर लागत नाही. मला खाजगी महाविद्यालयात शिकविण्याची माझ्या कुटुंबियांची ऐपत नाही त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांना मराठ्याच्या मुलाची कीव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल”
सुसाईड नोट आणि उत्तर पत्रिकेतील हस्ताक्षर जुळलं नाही
उपलब्ध माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी विवेकने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी सभोवतालची तपासणी आणि पंचनामा केला. परंतु, त्या दरम्यान त्यांना तेथे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. मात्र, दरम्यान, विवेक वापरत असलेल्या रजिस्टरमधून त्याची सुसाईड नोट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना हे रजिस्टर कुणीही दाखवले नव्हते. मात्र, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तातडीने ते रजिस्टर जप्त केले. सुसाईड नोट सोशल मीडियावरून वाऱ्याच्या वेगाने फिरली. मात्र, त्यानंतर तातडीने पोलिसांनी या सुसाईड नोटची सत्यता तपासण्यासाठी आपले काम सुरू केले. या चिठ्ठीतील हस्ताक्षर हे विवेकचेच आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी विवेकने ज्या शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, तेथील उत्तरपत्रिका हस्तगत करत, त्या उत्तर पत्रिकांतील हस्ताक्षर आणि कथित सुसाईड नोटमधील हस्ताक्षर, याची पडताळणी करण्यासाठी ते हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवले. परंतू, सुसाईड नोटमधील हस्ताक्षर आणि उत्तर पत्रिकेतील हस्ताक्षर हे जुळत नसल्याचे सत्य, हस्ताक्षरतज्ज्ञांच्या तपासणीत उजेडात आले आहे. त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार करत , ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय नेत्यांची उडी
विवेकच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षण प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी उडी घेत सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला, असं पार्थ पवारांनी म्हटलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही विवेक रहाडेच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारला दोषी ठरवलं होतं. मराठा आरक्षणातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणमुळे आणखी एक बळी गेल्याचं मेटे म्हणाले होते. खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं होतं. बीडमधील विवेकच्या आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं होतं.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!