Beed News Update : दीड लाख रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकासह चौघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सेवा निवृत्त शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी बारा लाख रुपयांची मागणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाने केली होती. या रक्कमेतील दीड लाख रूपयांचा पाहिला हप्ता घेताना संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक संक्षेचे सचिव अशोक चाटे, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत हंगे, साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष उद्धव कराड आणि दत्तात्रय धस अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


बीड येथील केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश विद्यालयातून एक शिक्षक गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, सेवकाळात त्यांच्यात आणि संस्थेत काही वाद निर्माण झाल्याने संबंधित शिक्षकास संस्थेने शाळेतून काढले होते. त्यानंतर न्यायालयीन लढाई लढून ते शिक्षक पुन्हा रुजू झाले होते. निवृत्त होईपर्यंत या शिक्षकाला मागील काळातील लाभ मिळाले नव्हते. तर शिक्षकावरच संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे सेवा बजावलेल्या काळातील थकलेला पगार देण्याची मागणी त्यांनी केली होती.


थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ तांबवाचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय  तांबवाचे मुख्याध्यापक अनंत बाबुराव हांगे, सानेगुरुजी विद्यालय तांबवाचे अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड आणि मेडिकल मालक दत्तात्रय सुर्यभान धस यांनी 12 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत विभागाने लाचेच्या रक्कमेतील हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताला पंचासमक्ष चारही जणांना भगवान मेडिकल स्टोअर येथे रंगेहाथ पकडण्यात आले .
 
दरम्यान, या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या