Ashish Deshmukh : "रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प विदर्भात उभारला तर, आम्ही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून देऊ,  आम्ही वेगळे विदर्भ राज्य मागणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केलं आहे. नाणारमध्ये तीव्र विरोध झाल्यानंतर या रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु, बारसू मध्येही विरोधाला सामोरं जावं लागत असलेला हा रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. 


नाणार नंतर बारसू याठिकाणी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारण्याबद्दलचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दिला आहे. मात्र, ही माहिती समोर येताच बारसू मध्येही रिफायनरीला विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे आधीपासूनच ही रिफायनरी विदर्भात उभारावी म्हणजेच विदर्भाचा विकास होऊ शकेल, अशी मागणी लावून धरणाऱ्या आशिष देशमुख यांनी ही रिफायनरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भाला दिली तर आम्ही विदर्भवादी वेगळ्या विदर्भाची मागणी सोडून देऊ असे,  म्हटले आहे. 


आशिष देशमुख म्हणाले, "विदर्भाच्या मागासलेपणामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे. मात्र, रिफायनरी सारखे तीन लाख कोटींचे महाकाय प्रकल्प विदर्भात आले तर विदर्भाचा सर्वार्थाने विकास होईल आणि काही वर्षांमध्येच विदर्भातील मागासलेपणा दूर होण्यास मदत होईल. या मुद्द्यावर आपण विदर्भवादीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू.  या रिफायनरीचा विदर्भाच्या विकासात काय फायदा होईल? हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू."


रिफायनरी प्रकल्प विदर्भाला देण्यासाठी विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावण्याची गरज आहे. शिवाय या प्रकल्पासाठी सर्वांनीच राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या