बीड : राज्यभर गाजलेल्या परळीच्या अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही महिन्यापूर्वी सुदाम मुंडेने न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती, मात्र याच गुन्ह्यात डॉक्टर सुदाम मुंडेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.


अवैध गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडेला सुरुवातीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने सुदाम मुंडेला जामीन देताना पुढचे पाच वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करता येणार नाही अशी अट घातली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतरही सुदाम मुंडेने लगेचच परळीच्या बाजूलाच रामनगर इथे एक हॉस्पिटल सुरु केलं होतं. जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सुदाम मुंडे लोकांवर उपचार करु लागला. लोक त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ लागले आहे. मात्र या हॉस्पिटलची पुन्हा प्रशासनाकडे तक्रार येऊ लागल्या. त्यानंतर बीडच्या जिल्हा प्रशासनाने डॉक्टर सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर 5 सप्टेंबर 2020 रोजी छापा टाकला. त्याला अटक करुन अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं. 


Dr. Sudam Munde Case : डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड


सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरुन आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सुदाम मुंडेला चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. परंतु औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (12 मे) त्याला जामीन मंजूर केला आहे.


स्त्रीभ्रूण हत्या करणारा कुकर्मा
स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैद्य गर्भपाताचा कर्दनकाळ डॉक्टर सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा 2016 रोजी भरला होता. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश झाला होता. डॉ. सुदाम मुंडे यांच्या कुकर्माचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता.  डॉ. सुदाम मुंडेच्या दवाखान्यामध्ये परळीत गर्भपात करण्यासाठी केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील देखील महिला येत असल्याचे तपासामध्ये उघड झाले होते.  या प्रकरणानंतर डॉक्टर सुदाम मुंडे याला दहा वर्षाची सक्तमजुरी सुद्धा झाली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.