बीड : अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर सुदाम मुंडे याला पुन्हा आठ वर्षाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. अवैध गर्भपात आणि एका महिलेचा मृत्यू प्रकरणांमध्ये 2016 साली सुद्धा मुंडेला दहा वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र जामीन मिळाल्यावर पाच वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करता येणार नाही आशा अटीवर उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. 


मेडिकल प्रॅक्टिसवर बंदी असतानाही पुन्हा थाटला डॉ. सुदाम मुंडे यांनी दवाखाना
 
स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैद्य गर्भपाताचा कर्दनकाळ डॉक्टर सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा 2016 रोजी भरला होता. ज्यावेळी मुंडेच्या रुग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर डॉ. सुदाम मुंडे यांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश झाला होता. डॉ. सुदाम मुंडे यांच्या कुकर्माचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता.  डॉ.  सुदाम मुंडेच्या दवाखान्यामध्ये परळीत गर्भपात करण्यासाठी केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील देखील महिला येत असल्याचे तपासामध्ये उघड झाले होते.  या प्रकरणानंतर डॉक्टर सुदाम मुंडे याला दहा वर्षाची सक्तमजुरी सुद्धा झाली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.


उच्च न्यायालयाने सुदाम मुंडेला जामीन देतेवेळी पुढचे पाच वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करता येणार नाही अशी अट टाकली होती. मात्र जामिनावर बाहेर आलेल्या सुद्धा मुंडे याने लगेच परळीच्या बाजुलाच रामनगर येथे एक हॉस्पिटल सुरू केले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सुदाम मुंडे लोकांवर उपचार करू लागला. लोक त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ लागले आहे मात्र या हॉस्पिटलची पुन्हा प्रशासनाकडे तक्रार येऊ लागल्या.


यापूर्वीसुद्धा मुंडे परळीमध्ये जिथे मुंडे हॉस्पिटल चालवायचा तिथून पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या अगदी ग्रामीण भागात त्याने हॉस्पिटल सुरू केले होते. अखेर बीडच्या जिल्हा प्रशासनाने डॉक्टर सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर 5 सप्टेंबर 2020 रोजी छापा टाकला आणि सुदाम मुंडेला रुग्णांवर उपचार करत असताना रंगेहाथ पकडले.


प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ज्यावेळी मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला. त्यावेळी चार रुग्णावर ती या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे पाहायला मिळाले होते. या सोबत रुग्णावरती उपचार करण्यासाठी लागणारी सगळी साधन सामग्री याठिकाणी प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतली होती.


डॉ. सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर छापा टाकण्यासाठी आलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यावर सुदाम मुंडे दबाव टाकत होता.  तर बघून घेण्याची धमकी सुद्धा या वेळी तत्कालीन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांना डॉ. सुदाम मुंडे यांनी दिली होती.


या छाप्यात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात व उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. बिपीन पाटील, डॉ. कुर्गे, डॉ. मेढे हे होते. सदरील छाप्यादरम्यान डॉ. सुदाम मुंडे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी मुंडेविरोधात गु.र.नं. 269/ 2020 अन्वये परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलिस निरीक्षक एकशिंगे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. 


त्यानुसार सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम 353 भा.द.वी. अन्वये चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, कलम 33 (2) मेडीकल व्यवसाय कायद्यान्वये तीन वर्षे शिक्षा व कलम 15(2) इंडियन मेडीकल कौन्सील कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी बाजू मांडली.