बीड : देशभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा होत आहे. परंतु, बीडमध्ये शहीद जवानांच्या वीरपत्नींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शहीद जवानांच्या कुटुंबाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या जमिनीचे अद्यापही वाटप करण्यात आले नाही. हे वाटप करण्यात यावे या मागणीसाठी या वीरपत्नींनी आंदोलन केले.  


देशाची सेवा करताना शहीद झालेल्या जवानांना सरकारकडून मोबदला म्हणून जमीन देण्यात येते. मात्र बीड जिल्ह्यातील देशसेवेसाठी शहीद झालेल्या काही जवानांच्या कुटुंबांना अद्यापही जमिनीचे वाटप करण्यात आले नाही. 


गेल्या अनेक वर्षांपासून या वीरपत्नी मोबदल्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. तरी देखील त्यांना अद्याप जमीन मिळालेली नाही. उलट त्यांच्याकडून अनेक कागदपत्रांची  आणि पुराव्यांची मागणी अधिकारी करत आहेत. त्यामुळे या महिलांनी आपल्या मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. आंदोलन कर्त्या महिलांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी लवकरच त्यांना जमीन दिली जाईल असे आश्वासन दिल आहे. 


दरम्यान, आज बीड पोलीस मुख्यालय परिसरात धनंजय मुंडे यांच्यासमोरच एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या सर्तकतेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला. पोलिसांनी त्याच्या हातून झिडेलचे कॅन काढून घेऊन त्याला त्याब्यात घेतले. परंतु, पालकमंत्र्यांच्या समोरच आणि तेही प्रजासत्ताक दिना दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


महत्वाच्या बातम्या