बीड : जलयुक्त शिवारच्या कामासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या कामामुळे गावं दुष्काळमुक्त झाली, का त्यात आणखीनच भर पडली अशी चर्चासुद्धा समोर येऊ लागल्याने 'एबीपी माझा'ने या जलयुक्त शिवारांच्या कामाचे रिअॅलिटी चेक करायचं ठरवले आणि बीडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेकनूर या गावी 'माझा' दाखल झाली.

नेकनूर मधल्या रामभाऊ जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यावर जलयुक्त शिवारच्या कामाचं दृश्य स्वरुप दिसलं. रामभाऊ आणि लक्ष्मण या दोन भावांच्या शेताच्या बाजूला असलेला नाला दोन वर्षांपूर्वी मृतावस्थेत होता, मात्र जलयुक्त शिवाराच्या कामा अंतर्गत या नाल्याचं रुंदीकरण आणि सरळीकरण झालं. त्यामुळे या दुष्काळसदृश्य परिस्थितीतही हा नाला पाण्यानं तुडुंब भरलेला आहे.

एकीकडे परतीच्या मानसून दगा दिल्यानंतर मराठवाड्यातल्या रबी पेरणीविना ओस पडत असताना रामभाऊंनी आपल्या शेतीमध्ये गव्हाची पेरणी केली. त्यांच्या विहिरीला असलेल्या थोड्याफार पाण्यावरती तुती आणि गव्हाची पेरणी केली आहे. जलयुक्त शिवाराचं काम होण्याअगोदर सीझनेबल पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती अवलंबून असायची, आता मात्र रब्बी आणि खरीप या दोन हंगामाइतकं पाणी त्यांच्या शेतीमध्ये उपलब्ध आहे.

जलयुक्त शिवारचा अहवाल

पाच वर्षांच्या भूजल पातळीचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी 14 हजार गावांतील भूजल पातळीत 1 मीटर घट आढळून आल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने दिला आहे. सप्टेंबर 2018 च्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात सादर केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षापूर्वीच्या तुलनेत राज्यातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यांमधील 13 हजार 984 गावांतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली. त्यापैकी 3 हजार 342 गावांमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त, 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटर आणि 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटरने भूजल पातळी घटली आहे.