भव्य सभामंडप, एकाचवेळी तब्बल 301 पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या, व्यासपीठावरुन गायिली जाणारी बारशाची गीते,अन् तुडूंब भरलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई. बीड शहरातील कीर्तन महोत्सवात सामूहिक बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पाळण्यापासून खेळणीपर्यंत आणि घुगुऱ्यापासून दुधापर्यंत सारंच अगदी नेटकं आयोजन करण्यात आलं होतं. मुलींच्या आईंना असे फेटे बांधण्यात आले होते. मुलींच्या आत्या त्यांच्या कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण करत होत्या.
मागील चौदा वर्षापासून बीड शहरात स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षी खटोड प्रतिष्ठानकडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींच नामकरण सोहळा भरवण्यात अला होता. यावेळी 301 मुलींचे पाळणे हलवण्यात आले. वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
स्त्रीभ्रूण हत्याने कलंकित झालेल्या बीड जिल्ह्यात आता मुलीचा जन्मदर झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळेच जिथे मुलींच्या जन्माचं इतक्या धूमधडाक्यात स्वागत केलं जातं, हेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाहिलं पाऊल म्हणावं लागेल.