बीड : राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहामी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यालाही 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहामी मिळाली आहे. मात्र या थकहामीवरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रयत्नामुळे ही थकहमी मिळाल्याचा दावा केला आहे. तर वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेली थकहामी ही आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाली आहे, असा दावा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे यांनी केला आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या 32 सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही हमी मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. वर्षी परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे.


आतातरी शेतकऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन 'वैद्यनाथ' सांभाळा - धनंजय मुंडे


स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते. त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते. राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत असा सल्ला धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना प्रशासनास दिला आहे.


मुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर संघाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच 'वैद्यनाथ' ला मिळाली थकहमी - पंकजाताई मुंडे


मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 10 कोटी 77 लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.