Beed Ganesh Utsav : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील (Beed Limba Ganesh News)लिंबागणेश गावात मागील तीनशे वर्षापासून तेरा गावांसाठी एक गाव एक गणपतीची परंपरा जोपासली जाते. या गावात कुंभारी मातीपासून तयार होणारा गणपती मोरावर आरूढ असल्याने त्याला मयूरेश्वर म्हणून ओळखतात. हे बालाघाटचे श्रध्दास्थान बनले आहे. गौरी बरोबरच गणेशाचे विजर्सन होत असल्याने इथला गणेशोत्सव केवळ पाच दिवसांचा आहे. त्याचबरोबर या गावात सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवला जात नाही. विशेष म्हणजे गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी यंदा रविवारी रात्री बारा वाजता मयूरेश्वर गणेशाची दृष्ट काढण्यात आली. ही परंपरा प्राचीन असून एका कलशावर कणकेचे सोळा दिवे ठेऊन रात्री बारा वाजता गणेश मूर्तीकार उमेश कानिटकर यांच्या हस्ते बंबाळ आरती केली जाते.
लिंबागणेशच्या गणेशोत्सवाला पेशवेकालीन वारसा
भालचंद्र गणपतीमुळे राज्यात प्रसिध्द असलेल्या सहा हजार लोकसंख्येच्या लिंबागणेशच्या गणेशोत्सवाला पेशवेकालीन वारसा आहे. इथे एक गाव एक गणपती परंपरा सुमारे तीनशे वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस गणेश रंगनाथ कानिटकर हे कोकण सोडून मराठवाड्यात आले. तेव्हा बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर कोकणातून मराठवाड्यात जे कोकणस्थ आले, त्यांत कानिटकरांचा उल्लेख आहे. कानिटकरांनी निजाम आणि पेशव्यांकडून इनाम खरेदी करून सनदा मिळवल्या. थोरले माधवराव पेशवे यांच्याकडूनही या गावी त्याकाळी पुष्पवाटिका मिळवली. पुढे व्यंकोजी गणेश कानिटकर यांनी परांडा तालुक्यातील विडे, बीड तालुक्यातील मांजरसुंभा, वानगाव, कळसंबर या गावांचे इनाम मिळवले. व्यंकोजींनी या गावात एका वाड्याचे बांधकाम केले. त्याच सरकारवाड्यात गणेशोत्सवात गणेश चतुर्थीला मयूरेश्वराच्या प्रतिष्ठापणा होते.
मूर्ती बनवण्याचीही वेगळी परंपरा
वंशपरंपरेने मूर्तिकलेचा वारसा दिवंगत मूर्तिकार माणिकराव कानिटकर यांच्या घरात असून सध्या त्यांचा मुलगा उमेश कानिटकर हे मूर्ती तयार करतात.ही मूर्ती तयार करण्यासाठी मुळूकवाडी येथील महोदव आहेरकर हे कुंभार माती पुरवतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चार हात असलेल्या चार फूट उंचीच्या मयूरेश्चराचे काम सुरू होऊन श्रावण वैद्य त्रयोदशीला पूर्ण होते. त्यांनतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून रंगकाम सुरू होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेशाची पूजा करून सरकारवाड्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
गणपतीची दृष्ट काढण्यासाठी बंबाळ आरती
गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी या मयुरेश्वराची रात्री 12 वाजता 16 ज्योती आणि एक मुख्य दिवे एका कलशावर ठेऊन गणपतीची दृष्ट काढण्यासाठी एक आरती केली जाते. या आरतीला बंबाळ आरती म्हंले जाते. बंबाळ आरती हा एक जागर असून सूर्य ज्यावेळी पूर्ण उदयाला येतो. त्यावेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी ही आरती करण्याची प्राचीन प्रथा आहे. याला सूर्यबंबाळ असे म्हणतात परंतु आता काळाच्या ओघात रात्रभर लोक जागू शकत नसल्याने ही आरती रात्री बारा वाजता होऊ लागली.
महाराष्ट्रातील मोरगाव, पाली, राजंणगाव या अष्टविनायकाप्रमाणे इथे द्वाराची परंपरा असून या क्षेत्राचे महात्म मोठे आहे. गणेश चतूर्थीला सरकारवाड्यात प्रतिष्ठापित होणाऱ्या मयुरेश्वराच्या मूर्तीत भालचंद्र गणेशाचे तेजोवलय प्रगटते. तर ऋषीपंचमीच्या दिवशी निघणाऱ्या छबिन्यातील भालचंद्राची उत्सव मूर्ती मयुरेश्वराला भेटण्यास येते अशी भाविकांची श्रध्दा आहे. गणेशोत्सवाच्या काळात मयुरेश्चराच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून हजारो लोक येतात. आपले नवस फेडतात, त्यामुळे मयुरेश्वराला दृष्ट लागते. ही दृष्ट काढण्यासाठीच विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री बंबाळ आरती केली जाते, अशी अख्यायिका असल्याचं गणेशभक्त रंजन कानिटकर यांनी सांगितलं.
राजेशाही थाटात निघते मिरवणूक
गौरी विसर्जनाच्या दिवशी मूळ नक्षत्र लागल्यानंतरच दुपारी दीड वाजता मुख्य आरतीनंतर मयुरेश्वराची विसर्जन मिरवणूक सागवानी पालखीतून सुरू होते. छत्री, चौरी, अब्दगिरी, चामर, ध्वज, दंड असा राजेशाही थाट व टाळ मृदंग अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात ही मिरवणुक सुरू असते.मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मिरवणुक काढण्यात आली नव्हती. गणपतीच्या मिरवणूकीसमोर गावातील परीट बांधव धोतराच्या पायघड्या घालतात. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा गजरात चंद्रपुष्कर्णी तीर्थावर गणेशाला निरोप दिला जातो. महाराष्ट्रातील असा आगळावेगळा गणेशोत्सव गौरी विसर्जनाच्या दिवशी संपतो.
कसा असतो हा मयूरेश्वर गणपती?
कुंभारी मातीपासून मयूरेश्वराची मूर्ती तयार झाल्यांनतर या मूर्तीच्या टोपाला सोनेरी, डोक्यावर काळा, कमरेवर शेंदरी, हातापायांना गोरा रंग दिला जातो. दोन हातांपैकी उजव्या हातात त्रिशूल तर डाव्या हातात परशू असतो. मूर्तीचा खालचा उजवा हात हा अभय देणारा असतो. डाव्या हातात मोदक, पायात घागऱ्या, कमरेला साखळ्या, हातात गोठ, दोन्ही पायात चांदीच्या पादुका, कानात कुंडले तर वाहन असलेल्या मोराच्या तोंडात मोत्याची माळ आणि डोक्यावर तुरा अशी ही गोजिरी मयूरेश्वराची मूर्ती असते, अशी माहिती दिनेश लिंबेकर यांनी दिली