Beed Crime News : बीडच्या (Beed) आष्टी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात सासर्‍याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा चक्क सुनेला मिळाली आहे. यात जातपंचायतीने सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. अखेर याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. परिणामी, प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाला. मात्र महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल


मालन फुलमाळी यांचे सासरे नरसु फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. यांची जात तीरमाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने नरसु फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड भरला न गेल्याने जात पंचायतीने मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


खाजगी शिकवणी वर्गात शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार


बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील ए टू झेड इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी चालविणाऱ्या शिक्षकाने एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीला "तुला काहीही प्रॉब्लेम आल्यास मी आहे , काळजी करून नको..!" असं म्हणत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने ही बाब आपल्या मैत्रिणींना सांगितली आणि मैत्रिणींनी विद्यार्थिनींच्या पालकांना सांगितली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी शिक्षक किशोर पाटील यांच्या विरुद्ध कलम ७५ BNS सह कलम ८ पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे बदलापूर घटनेनंतर सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास बंधनकारक केलं होतं , मात्र या इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी व परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


हे ही वाचा