Hasan Mushrif : गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोध आहे. केंद्र सरकारच्या अन्यायी कामगार कायद्यांविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा, असे आवाहन माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आयटकच्या (All India Trade Union Congress) कोल्हापुरातील तीनदिवसीय महाराष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 


हसन मुश्रीफ म्हणाले, गुंतवणूकीसाठी उद्योजकांना आकर्षक सवलती देण्याबद्दल आमची हरकत असण्याची गरज नाही. परंतु, कामगारांचं रक्त शोषून घेऊन अशा प्रकारच्या गुंतवणूक येण्याला आमचा ठाम विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगार विरोधी धोरणे करायची आणि उद्योगपतींना लाल कार्पेट अंथरून गुंतवणुकीसाठी आणायचे नाटक करायचे, अशा प्रकारचे उद्योग या देशात सुरू आहेत.  


ते पुढे म्हणाले की, कामगार वर्गाने जागृत होण्याची वेळ आली आहे. नव्या बदलत्या कामगार कायद्यामध्ये कायम वेतनावरील कामगार हा प्रकारच बंद झाला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून लढा पुकारला नाही कायम कामगार ही संज्ञाच नाहीशी होईल. फक्त दैनिक वेतन, फिक्स पगार आणि कंत्राटी कामगार एवढेच तीन प्रकार शिल्लक राहतील. अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे खंबीर उभा राहण्याचे काम कायमपणे करू. 


मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या अकरा कोटी लोकसंख्येपैकी 5 कोटी लोक कामगार या संज्ञेखाली येतात. त्यापैकी केवळ 80 लाख कामगार संघटित व संरक्षित आहेत. उर्वरित सव्वाचार कोटी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यंत्रमाग कामगार, ड्रायव्हराचे कल्याणकारी मंडळ, घरेलू कामगार मंडळ, शेतमजूर कल्याणकारी मंडळ या सगळ्यांचा मसुदा तयार आहे. सत्ता नसली तरीही या कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणार आहोत. 


यावेळी राष्ट्रीय सचिव सुकुमार बांदे,  सी. एम. देशमुख, कॉम्रेड खानोजी काळे, कॉम्रेड दिलीप पोवार, कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड एस. बी. पाटील, कॉम्रेड मोहन शर्मा, कॉम्रेड मिलिंद रणरे, कॉम्रेड सुभाष जाधव, कॉम्रेड अजित लवेकर आदी प्रमुख उपस्थित होते.


दरम्यान, उद्या 19 नोव्हेंबर रोजी आयटक अधिवेशनात प्रतिनिधी सत्र होणार आहे. तसेच फेडरेशनच्या कार्यअहवालाचे सादरीकरण होईल. सायंकाळी 5 वाजता कॉम्रेड भालचंद्र कानगो यांचे ‘भारतीय स्वातंत्र्यलढयात आयटकचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर रोजी आयटकच्या नूतन राज्य कौन्सिलची निवड आहे. यादिवशी सकाळी साडे अकरा वाजता राजर्षी शाहू महाराज स्मृतिस्थळापासून कामगारांची रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील विविध मार्गावरुन ही रॅली निघेल. दुपारी दोन वाजता दसरा चौक येथे रॅली दाखल होईल. याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. याप्रसंगी आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजित कौर मार्गदर्शन करणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या