Pune Crime News : राजगुरुनगर शहरात (pune crime) भरदिवसा एका 28 वर्षीय तरुणीचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (16 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोमल गणेश केदारी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खुनाचं कारण नेमकं काय आहे?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या खुनामुळे शहरात भीतीचं वातावरण झालं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वडील विठ्ठल ज्ञानेश्वर थिगळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी कोमल गणेश केदारी घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने तिला चांंडोली गावातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यानंतर चाकणच्या रुग्णालयात तिला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिला होता. चाकणच्या रुग्णालयात तापसणी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिचे पोस्टमार्टम करण्यात आलं. यात तिचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं स्पष्ट झालं. भर दिवसा महिलेचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहेत.


पुणे जिल्ह्यात खूनाचं सत्र संपेना
पुण्यातील (pune) तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या (Pune crime) झाली होती. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव होतं. हा तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. प्रणवच्या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद उमटले होते. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेव्हा वीस जणांची टोळी त्यांच्या दिशेने आली. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे काही मित्र जीव वाचवण्यासाठी धावत होते. मात्र या टोळीने त्यांचा पाठलाग करुन हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीतच आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. यात 4 अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही समावेश होती. चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.