नागपूरः राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच व्हावे, पण जर ते केंद्रात गेले तर राज्यात बावनकुळे हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात. तसं मी म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले नेते पुढे काय होतात, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे गडकरी म्हणाले, मी असं म्हणत नाही की बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पुढे काय होतात. हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे माध्यमांनी 'फडणवीसांना गडकरींचे संकेत' केंद्रात जाणार अशा बातम्या माझ्या नावाने खपवू नका, हिम्मत असेल तर तुमच्या नावाने चालवा, असा चिमटाही माध्यमांना त्यांनी काढला.
बावनकुळेंची विरोधकांनाही भुरळः फडणवीस
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे संघर्ष आणि कुठलेही मिळालेले काम पूर्ण करण्याची चिकाटी बघून त्यांना पक्षाने वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. दिलेल्या संधीचे सोनेही त्यांनी केले. बावनकुळेंच्या कार्यशैलीने तर विरोधकही भुरळ घातली आहे. प्रस्ताव तर कोणताही नेता सादर करतो, मात्र ते बजेटमध्ये कसे आणता येईल याचा अभ्यास बावनकुळेंना आहे. विरोधातील आमदार अर्थमंत्र्यांकडे कायम तक्रार करायचे की आमच्यापेक्षा जास्त निधी बावनकुळेंना कसं, त्यावेळी अर्थमंत्री म्हणायचे की त्यांच्याकडून मागोवा घेणे शिका, आणि प्रस्ताव सादर केल्यावर बजेटमध्ये उमटविण्यासाठी त्यांचे परीश्रम बघा, या आठवणींवरही फडणवीसांनी उजाळा टाकला.
Nitn Gadkari : 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग
पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवणारः बावनकुळे
माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने खूप काही दिले आहे. त्यामुळे माझे अस्तित्व हे पक्षामुळेच आहे. पक्षाने राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ही खूप मोठी बाबा आहे. पक्षविस्ताराच्या या संधीचा नक्कीच उपयोग करुन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा विकास घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Devendra Fadnavis : विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बावनकुळेंची स्तुती व्हायची, ही विदर्भातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब
सत्कार सहोळ्यापूर्वी तिरंगा रॅली
सत्कार सोहळ्यापूर्वी नागपुरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रविण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह शहर, जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.