Ajit Pawar In Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा 'लवकरच' हा शब्द आवडीचा झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळाबाबत कधीही विचारा ते लवकरच असंच उत्तर देत होते आता खातेवाटपाबाबत विचारलं तरी तेच उत्तर देत आहेत. अधिवेशनात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सही करावी लागते. त्यामुळे त्यांनी अधिवेशनापुर्वी खातेवाटप केलं पाहिजे. स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र यंदा पालकमंत्रीच नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पालकमंत्री नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या सरकारमुळे राज्याच्या लोकांच्या मनात नाराजी आहे हे पदोपदी जाणवत आहे. ज्या शिवसैनिकांनी यांना निवडून दिलं त्यांच्या मनात नाराजी आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना राजकारणात पुढे कधीच यश मिळालं नाही. महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही,असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीकडून एकत्रित लोकसभा निवडणूक लढवण्यात आली तर चित्र वेगळे असेल. याबाबत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील. आगामी अधिवेशनात लोकांच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा
बारामती विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निर्मला सितारामाण यांचं स्वागत करतो. बारामतीच्या विकासाची माहिती करुन घेण्यासाठी पंतप्रधान येऊन गेले. त्यासोबतच अनेकजण येऊन गेलेत. त्यांच्याकडून निर्मला सीतारमण यांना माहिती मिळाली असेल. त्यांनी बारामतीचा विकास पहायला यावे, असंही ते म्हणाले. निर्मला सितारमण यांनी निवडणूकीची जबाबदारी घेतली आहे मात्र कोणी निवडणुकीची जबाबदारी घेतल्याने काही होत नाही. उद्या मी पण वाराणसीची जबाबदारी घेऊ शकतो. मात्र जबाबदारी घेणाऱ्यांनी विचार करायचा आहे की आपण खरंच काही करु शकतो का?, आपण वेळ वाया घालवत आहोत, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
एकनाथ शिंदेंनीच घेतलेला निर्णय बदलला
प्रभाग रचनेचा निर्णय बदलण्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे कारण या सरकारला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढं ढकलायच्या आहेत. निवडणूकांसाठी त्यांना आता वेळ हवा आहे. एकनाथ शिंदे यांनीच नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी नवीन प्रभागरचनेचा प्रस्ताव आणला होता आणि आता मुखमंत्री असताना त्यांनीच निर्णय बदलला, या बाबत एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पार्थ पवारांनी त्यांचं ठरवावं
नेत्यांनी फिरलं पाहिजे. लोकांना भेटलं पाहिजे मात्र आपण कोणावर काम कर म्हणून बळजबरी करु शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी काय करायला हवं त्यांनी त्याचं ठरवायला हवं, त्यावर मी त्यांना सल्ला किंवा त्यांच्यावर बळजबरी करत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
लाल सिंग चढ्ढा चित्रपट पाहिला नाही
लाल सिंग चढ्ढा चित्रपट बघितला नसल्याने मी त्यावर काहीही विधान करणार नाही मात्र आता अनेक लोक पब्लिसीटीसाठी बॉयकॉट करा किंवा अनेक प्रकारच्या चर्चा करतात. त्यावरुन जनता आकर्षित होते आणि चित्रपट बघायला जाते. यांचाही पब्लिसीटी स्टंट असू शकतो, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.