नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत तिरंगा रॅलीला नागपुरात सुरुवात झालेली आहे. त्रिशरण चौकातून ही रॅली निघालेली आहे. यावेळी भाजप नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. या रॅलीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सहभागी झालेले आहेत. आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूरसह महाराष्ट्रभर उत्साह आहे. 130 कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आवाहन स्वीकारून या उपक्रमात सहभागी झाले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले आहेत. जनता स्वतःहून या सोहळ्यामध्ये आली आहे. शहरातील त्रिशरण चौकातून रॅलीला सुरुवात झालेली आहे.


रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' Azadi Ka Amrit Mahotsav निमित्ताने 'हर घर तिरंगा' हा नारा दिला आहे. आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे. प्रत्येकाला विनंती आहे की, 15 ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा डौलाने फडकला पाहिजे. प्लॅस्टिकचा झेंडा फेकला जातो. त्यामुळे तो वापरू नये. जमिनीवर पडलेला तिरंगा बघितला तर शहिदांना आपण काय उत्तर आपण देऊ? घरावर तिरंगा योग्य वेळी लागला पाहिजे आणि योग्य वेळी सन्मानाने उतरवला पाहिजे. ज्यांनी आपल्या जिवाचं बलिदान दिलं. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा लढला. फासावर लटकवलं तरी भारत माता की जय म्हणत होता, वंदे मातरम् म्हणत होता. त्यामुळे हा उपक्रम आपल्याला प्रामाणिकपणे राबवायचा आहे.


Chandrashekhar Bawankule : ऑटोचालक, झेडपी सदस्य, आमदार ते ऊर्जामंत्री, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष


हे आहेत नियम...


भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावीत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.


अशी घ्या काळजी...


केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रध्वज फडकविताना प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करत ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा. राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे फडकवावा. राष्ट्रध्वज उतरवताना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.