Aurangabad News: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित काल मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर औरंगाबादच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. कारण वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सतीश चव्हाण एक गट तयार करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत असतात. तर औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून येणार नाही यासाठी देखील सतीश चव्हाण प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केला आहे. वैजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. 


यावेळी बोलताना चिकटगावकर म्हणाले की, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्याठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी पक्षात वेगळा गट तयार करण्याचे काम आमदार चव्हाण करतात. त्यानंतर निवडणूक लागताच त्या गटाला विरोधी पक्षात पाठवून आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला मी विरोध करून देखील त्यांना अजित पवारांच्या उपस्थितीत काल प्रवेश देण्यात आल्याचं म्हणत चिकटगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.


यापूर्वी असाच प्रयोग...


पुढे बोलतांना चिकटगावकर म्हणाले की, वैजापूरमध्ये  सतीश चव्हाण यांच्याकडून करण्यात येत असलेला प्रयोग यापूर्वी पैठण आणि कन्नडमध्ये देखील झाला आहे. कारण पैठणमध्ये तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे यांच्या विरोधात देखील चव्हाण यांनी वेगळा गट तयार केला होता. पुढे त्यांना विरोधी पक्षात पाठवून  वाघचौरे यांना पाडण्याचे काम झाले. तसेच कन्नडमध्ये देखील 2014 मध्ये उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात एक गट तयार करून हर्षवर्धन जाधव यांच्याकडे पाठवण्यात आला. ज्यामुळे त्यांचा पराभव झाला. मात्र आपल्याच पक्षाचे सतीश चव्हाण आपल्या विरोधात काम करत असल्याचा समजल्यावर उदयसिंह राजपूत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणं पसंद केलं असंही चिकटगावकर म्हणाले.


पुढील पंधरा दिवसांत निर्णय घेणार...


ठोंबरे गटाला विरोध केल्यानंतर ही त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आल्याने चिकटगावकर यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. तर पुढील पंधरा दिवसात तालुक्यातील कार्यकर्त्यांची गावागावात जाऊन मी भेट घेणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या पक्षात जायचं किंवा राष्ट्रवादी थांबायचं याबाबत मी निर्णय घेणार असल्याचे सुद्धा चिकटगावकर यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे शिंदे गट सोडून सर्वच पक्षाचे माझ्यासाठी पर्याय खुले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं. त्यामुळे आगामी काळात चिकटगावकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास नवल वाटू नये.