बारामती : लग्नाची गडबड असल्यामुळे धावतपळत दिलेली निमंत्रणं 'घोड्यावरुन' दिली असं म्हटलं जातं. मात्र हा वाक्प्रचार बारामतीतील शेतकऱ्याने प्रत्यक्षात आणला. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका थेट घोड्यावरुन वाटली.


सकाळच्या वेळी गावात रस्त्यावरुन घोड्याच्या टापांचा आवाज आला. कोणाचा घोडा आहे, हे पाहण्याआधीच घोडा दरवाज्यात थांबला. 'रामराम पाहुणे! लग्न पत्रिका द्यायला आलोय.. लग्नाला यायचं!' असा आवाज चक्क घोड्यावरुन आला.

बारामतीतील डोर्लेवाडीत दादासो मोरे राहतात. लग्नाला भरमसाठ खर्च असतोच, मात्र त्यात पेट्रोलच्या खर्चाची भर पडल्यामुळे त्यांनी घोड्यावरुन पत्रिका वाटण्याची शक्कल लढवली. या आगळ्या-वेगळ्या निमंत्रणामुळे गावभर चर्चा रंगली आहे.

'माझ्या मुलीचं सात जुलैला लग्न आहे. लग्न म्हटलं की भरमसाठ पैसा लागतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गाडीवर फिरणं परवडत नसल्याने मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका माझ्याकडे असलेल्या घोड्यावर जाऊन वाटत आहे.' असं मोरे म्हणतात.

पैशांची थोडीफार बचत व्हावी, या हेतूने मी घोड्यावर पत्रिका वाटत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी दादासो मोरे यांनी केली आहे.