नागपूर: "बाबा तुम्हाला अनेकवेळा माहित नसतं, कुणाचंही ऐकून, माहिती न घेता आरोप करता. सज्जन माणसं असं करत नसतात, माहिती घ्या आणि आरोप करा," असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला.


सिडकोच्या जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं.

जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मी राजीनामा देणार नाहीच, पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कथित सिडको जमीन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील 200 सात बारा प्रकरणीही चौकशी होणार आहे.

तुमच्या सरकारने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे अधिकार दिले. त्यामुळे ज्यांना जमिनी दिल्या त्यांनी जमिनी विकून टाकल्या. जर चौकशीच करायची झाली तर पृथ्वीराज चव्हाणांपासून, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या सगळ्यांचे राजीनामा मागावे लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधी पक्ष नेत्यांनी अर्धी वस्तुस्थिती मांडली, आता मी पूर्ण सांगतो. रायगड जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त 35 गावं आणि 12 वाड्या 751 प्रकल्पग्रस्त आहेत. रायगड जिल्ह्यात 311 प्रकल्पग्रस्तांना पूर्ण 316 अंशतः जमीन दिल्या. आतापर्यंत पूर्णत: बाधितांना 320 हेक्टर, अंशतः बाधितांना 286 हेक्टर अशी एकूण 606 हेक्टर जमीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना याच भागात जमिनी दिल्या. एअरपोर्टच्या जमिनी बाबांच्या काळात दिल्या."

कायद्याने तरतूद केली आहे.  2001 अधिनियम 11 नुसार अधिसूचना आहे, अशा प्रकारचे प्रकल्पग्रस्त त्यांनी दाखवलेल्या भागात पात्र व्यक्तींना जमीन द्यायची.  मुंबईवाल्यांना स्क्वेअर फूट कळतं.

उच्च न्यायालयाने या शेतकऱ्यांना जमिनी न दिल्याने आदेश दिले, जमिनी द्या म्हणून.

ही जमीन विकता येते का? वर्ग एकची जमीन आहे, तुमच्या काळात 20 जुलै 2012 रोजी आदेश काढला. प्रकल्पग्रस्तांना वर्ग 1 च्या जमिनी द्यायच्या.

वर्ग 1 जमीन ती कुणालाही विकता येते. या प्रकरणात 9 हेक्टर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात जमीन प्रकल्पग्रस्तांना दिली.

तुमच्या काळात जमीन वाटप झालं, तुमच्याकडे फाईल आली का,  ही जमीन राज्य सरकारकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. नियोजनाचे अधिकार सिडकोकडे आहे. त्यांना जमीन मागावी लागते.

सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, प्रकल्पग्रस्तांचा जमिनीवर पहिला अधिकार. जमिनीचा मालक राज्य सरकार आहे, सिडकोचा संबंध नाही. ती शेतजमीन आहे, शेतजमीन म्हणून दिली. ही शेतजमीन आहे, बिल्डरने शेतजमीन म्हणून खरेदी केली.

कुणाकुणाचे राजीनामे मागणार?

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सात बाराचे उतारे वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी 200 सात बारा दाखवले.

पृथ्वीराज चव्हाण तुमच्या काळातल्या, कुणा कुणाचे राजीनामे मागणार? अशोक चव्हाण, विलासराव, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सगळ्यांचे राजीनामा मागावे लागतील.

तुमच्या सरकारने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे अधिकार दिले. त्यामुळे ज्यांना जमिनी दिल्या त्यांनी जमिनी विकून टाकल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन दिली, महसूल मंत्री,मुख्यमंत्री यांचा संबंध नाही. संशयाच्या घेऱ्यात नको, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील 200 प्रकरणांचीही चौकशी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल

बाबा तुम्ही कुणाचंही ऐकत जाऊ नका, तुम्हाला माहित नसतं. वॅक्स म्युझियमजवळची जमीन ना विकास क्षेत्रात होती. त्यावेळी जजोरियांनी मागणी केली जमीन द्या. मार्ग काढण्यात आला. ही जमीन रहिवासीमध्ये समाविष्ट केली. बाबा तुम्ही सही केली आणि जमीन दिली. ही जमीन रहिवासी क्षेत्रात आली, ती जमीन रातोरात 'भतीजा'ने विकत घेतली.

मी सल्ला देतो बाजूच्याचे ऐकून आरोप करु नका. तुम्ही खात्री करुन घ्या. मग आरोप करा, असं फडणवीस म्हणाले.

चाचाचा भतिजा कोण?

पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत भतीजाचा चाचा कोण हे सिद्ध होईल असं सूचक व्यक्त केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जजोरीयची जमीन भतीजा बिल्डरला दिली आणि या व्यवहारावर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनीच सही केली होती. त्यांनतर भतीजा बिल्डरला जमीन मिळाली. त्यामुळे भतीजाचा चाचा पृथ्वीराज चव्हाण असल्याचा पलटवार आज मुख्यमंत्र्यांनी केला.

लोणावळा मौजे वरसोली तालुका मावळ जिल्ह पुणे चंद्रकुमार जजोरीया यांची जवळ जवळ बारा एकर जमीन भतीजा बिल्डरला पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात देण्यात आली.

विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा

विरोधी पक्षनेते, आम्ही काचेच्या घरात राहत नाही. मी राजीनाम्या देण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही खोटे आरोप केले तुम्ही राजीनामा द्या, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला : काँग्रेस  

प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा