धुळे : सोने तारण योजनेत खोटे सोने खरे असल्याचे दाखवून बनावट मुल्यांकन प्रमाणपत्र तयार करुन दोंडाईचा येथील महाराष्ट्र बँकेची दोघा सराफांनी एक कोटी 45 लाख 47 हजार 226 रुपयांची फसवणूक केली आहे. ही बाब स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेअंतर्गत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाली असून या प्रकरणाचा दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


दोंडाईचा येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत सोने तारण कर्ज अंतर्गत सराफांकडून संबंधित सोन्याचे मूल्यांकन करण्याचे काम दोंडाईचा येथील संदीप दिनानाथ सराफ आणि ऋषभ संदीप सराफ यांच्याकडे देण्यात आले होते. तसेच संबंधित ग्राहकांच्या दागिन्यांची तपासणी करुन त्याचे मूल्यांकन केल्यानंतर कायदेशीर प्रमाणपत्र देण्याचे काम या सराफांकडे होते. या दरम्यान काही प्रकरणांमधील सोन्याची प्रत आणि प्रमाणपत्रांबाबत बँकेच्या प्रशासनास संशय आला.


त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक राजेश देशमुख यांनी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्याकडे केली. त्यामुळे पोलिस अधीक्षक पंडीत व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत बेंडाळे यांना प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले.


यात तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. यात उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, गयासोदीन शेख, हिरालाल ठाकरे, भूषण जगताप, नितीन चव्हाण, रविंद्र शिंपी, मनोज बाविस्कर, सुरेश पाटील या पथकाने बँकेतील सोने तारण प्रकरणांचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला. या बँकेत 5 फेब्रुवारी 2015 ते 25 सप्टेंबर 2019 या दरम्यानच्या प्रकरणांमध्ये बनावट सोन्याला खऱ्या सोन्याचे प्रमाणपत्र देवून खोटे मूल्यांकन प्रमाणपत्र तयार करण्यात आले. यानंतर हे खोटे प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी सोने तारण कर्ज प्रकरण तयार केले गेले. यातून बँकेची तब्बल 1 कोटी 45 लाख 47 हजार 226 रुपयांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे दोंडाईचा पोलिस ठाण्यात या दोघा सराफांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.