पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे 31 कोटी 65 लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे.



लिलावात बोली लावण्यासाठी 86 लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे. 21 जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत. 23 जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि पत्नी हेमंती हे सध्या अटकेत आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.


काय आहे प्रकरण?
डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.


डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.