नवी दिल्ली : कोरोनामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बांग्लादेश सीमेवर अडकलेला माल आता निर्यातीसाठी मोकळा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, निफाड परिसरातल्या शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो आणि द्राक्षेसारखा शेतमाल बांग्लादेश सीमेवर काही दिवसांपासून अडकलेला होता. जवळपास साडेतीन हजार ट्रक माल गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश सीमेजवळ महादीपूर इथे अडकून पडला होता.


भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आता ही वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 एप्रिलपासून ही वाहतूक सुरु होत असल्याचं विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. त्याबाबत बांगलादेश सरकारच्या परवानगीचं पत्रही त्यांनी त्यात जोडलं आहे. त्यामुळे महादीपूर इथून हा माल आता लवकरच बांगलादेशाल्या शिवगंज बाजारपेठेत पोहचणार आहे.





सध्या रमजानचा महिना सुरु झाल्यामुळे बांग्लादेशमध्येही या फळांची मागणी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही संक्रमणाचा धोका होऊ नये यासाठी पूर्णपणे सॅनिटाईज करुन या कंटेनरची पुढची वाहतूक होणार आहे. देशात सध्या लॉकडाऊन असलं तरी ग्रामीण अर्थव्यवस्था सुरु करण्याकडे सरकारचा भर आहे.


...तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र


शेतमालाशी संबंधित उद्योग सुरु व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. निर्यातीसाठी पाठवलेला हा माल मध्येच अडकून पडल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते. पण आता उद्यापासून या निर्यातीस हिरवा कंदील मिळाल्यानं आता त्यांना दिलासा मिळणार आहे.





Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट