पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा काळात भाविकांना पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन पोलीस व प्रशासनाने केले आहे. शहरातील जवळपास 1200 मठ व धर्मशाळेत दाखल झालेल्या भाविकांना मठात राहू देऊ नये अशा नोटीस पोलीस विभागाने बजावल्या आहेत. यावर आज वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत बंडातात्या कराडकर यांनी आक्षेप घेत जे यापूर्वीच मठात दाखल झाले आहेत, त्यांना बाहेर हाकलू नका हवे तर त्यांना संचारबंदी काळात बाहेर पडू देऊ नका. मात्र, त्यांना मठ अथवा धर्मशाळेबाहेर घालवण्यासाठी पोलिसांनी जबरदस्ती केल्यास याला उग्र स्वरूप येईल असा इशारा दिला आहे.


प्रशासनाच्या आवाहनानंतर राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या पंढरपूरकडे येण्याच्या ऐवजी जागेवरच थांबल्या आहेत. मात्र, ज्या दिंड्या अथवा भाविक यापूर्वीच आले आहेत, त्यांना पंढरपुरात राहू द्यावे असे आवाहन बंडातात्या यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे. नव्याने येणाऱ्या भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस रोखत असतील तर त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, जे आधीपासून आले आहेत, त्यांना बाहेर काढल्यास उग्र आंदोलन होईल, असा इशारा बंडातात्या यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना यापूर्वीच नोटीस बजावून वारकऱ्यांना मठात ठवून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर आज बंडातात्या यांनी यास आक्षेप घेतला आहे.


Maghi Yatra |माघीसाठी पंढपुरात हजारो दिंड्या दाखल; पोलिसांकडून 1200 पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस


पंढरपूर शहरासह 10 गावात 24 तासांची संचारबंदी जाहीर
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.


कोरोनामुळे यात्रा काळात कोणाही भाविकाला अथवा दिंडीला पंढरपूर मध्ये येत येणार नाही. शहरातील सर्व 1200 मठ व धर्मशाळेत आलेल्या भाविक व वारकऱ्यांना परत पाठवायची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली असून यात्रेपूर्वी आलेल्या भाविकांना परत जावे लागणार आहे. मंदिर समितीने यापूर्वीच दशमी व एकादशी म्हणजे 22 आणि 23 फेब्रुवारीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात देवाचे सर्व नित्योपचार व एकादशीची महापूजा कोरानाचे नियम पळून करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . यावेळी उपस्थित राहायची परवानगी दिलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे.