पुणे: पंढरपूर, आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी भाजपा खासदार अमर साबळे यांनी केली आहे. आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत  साबळे यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली.


 

देहूच्या विश्वस्तांनी साबळे यांच्या पाठीशी उभं राहात या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. परंतु बैठकीत उपस्थित पालकमंत्र्यांनी यावर कोणतीच भूमिका घेतली नाही.

 

या बैठकीस पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालक मंत्री विजय देशमुख, लोकप्रतिनिधी, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी, तिन्ही देवस्थानचे विश्वस्त, दिंडी प्रमुख वारकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तसेच नितीश कुमार यांनी बिहारमध्ये ज्याप्रमाणे दारू बंदीचा धाडसी निर्णय घेतला,  तसंच धाडस महाराष्ट्र सरकारने दाखविण्याच आवाहन साबळे यांनी केलं.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसुलातून येणाऱ्या पैशाची पर्वा न करता, हा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं साबळे यांनी सांगितलं.

 

साबळे यांच्या मागणीला देहू संस्थानचे माजी विश्वस्त शिवाजी मोरे यांनीही पाठींबा दर्शविला असून वारकरी संप्रदायाला पाठीशी उभं करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

साबळे यांनी ही मागणी ज्या बैठकीत केली त्या बैठकीत सत्ताधारीच अधिक होते. दारूबंदीचा हा विषय अडचणीचा ठरू शकतो, हे लक्षात घेता कोणी काहीच भूमिका घेतली नाही. परंतु स्वतः सत्तेत असतानाही साबळे यांनी ही मागणी केल्याने राज्य सरकार कोंडीत अडकलं आहे. तर येणाऱ्या पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदायाने या मागणीवर जोर लावला तर नव्या वादंगाला सरकारला सामोर जावं लागणार, हे नक्की.

 

नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड