पुणे : हृदयरोगाने त्रस्त असलेल्या पुण्याच्या सहा वर्षीय चिमुकलीची 'मन की बात' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकली. वैशाली यादव या चिमुकलीने मदतीसाठी थेट मोदींना पत्र लिहून साद घातली. त्यानंतर मोदींनीही त्याला प्रतिसाद देत सर्वोतपरी मदत दिली.
काय आहे प्रकरण?
हृदयाला छिद्र असल्यामुळे सहा वर्षाची वैशाली जीवन-मृत्यूच्या सीमेवर उभी होती. व्यवसायाने पेंटर असलेले वडील त्यांच्यापरीने वैशालीला वाचवण्यासाठी जीवापाड धडपडत होते. मात्र चिमुकल्या वैशालीच्या हृदयावर भली मोठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. वैशालीची खेळणी, सायकल विकून, त्यावर औषधोपचार करणाऱ्या वडिलांची इतकी मोठी शस्त्रक्रिया करण्याची ऐपत नव्हती.
मोदींना टीव्हीवर पाहून वैशालीचं पत्र
खेळण्याच्या वयात आर्थिक परिस्थिती म्हणजे काय हे न कळणाऱ्या वैशालीचा समजूतदारपणा वाखाणण्याजोगा होता. एकेदिवशी टीव्हीवर मोदींना पाहून, वैशालीनेही त्यांना पत्र लिहिण्याचं ठरवलं. स्वत:च्या वडिलांची स्थिती पाहून, वैशालीने कागद-पेन हाती घेतला आणि स्वत:ची 'मन की बात' थेट मोदींना लिहिली.
दुसरीत शिकणाऱ्या वैशालीने स्वत:चं आजारपण, कौटुंबीक स्थिती, याची माहिती सविस्तरपणे मोदींना कळवली. या पत्रासोबत तिने आपल्या शाळेचं ओळखपत्रही जोडलं.
या पत्रानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून काही रिप्लाय येईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
मोदींचा आठवड्यात रिप्लाय
चिमुकलीचं पत्र मिळताच एका आठवड्याच्या आत पंतप्रधान कार्यालयाने, तातडीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. वैशालीला शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश पीएमओने दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न
पीएमओकडून आदेश आल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकार सौरव राव यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. पुणे जिल्हा प्रशासनाने घरचा पत्ता शोधून वैशालीला तातडीने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केलं. इथे तिच्यावर दोन जूनला मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर प्रकृती सुधारलेल्या वैशालीला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. श्रीकर परदेशींचे आदेश
कर्तव्यदक्ष आयएएस अशी ख्याती असलेले आणि सध्या पीएमओमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांची या सर्व प्रकरणात महत्त्वाची भूमिका होती. कारण वैशालीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले होते.
वैशाली ठणठणीत
वैशालीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती ठणठणीत झाली असून, कालच तिला डिस्चार्ज देण्यात आला, असं रुबी हॉल क्लिनीकचे डॉ.संजय पठारे यांनी सांगितलं.