मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या “देह वेचावा कारणी”  या आत्मचरित्राचं  प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून दिली होती. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था' असे नाव देण्यात आले.


पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात संबोधन करताना म्हणाले की, 'बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रचं नाहीतर देशाच्या अनेक भागात मंत्रिपदाच्या काळात काम केलं. ज्या काळात ग्रामीण भागांत शिक्षणाची चर्चाही होत नव्हती, आशा काळात त्यांनी शिक्षण संस्था सुरु केल्या. साखर उद्योगला चालना दिली. शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले, शेतकऱ्यांची उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नव्या जुन्याचा मेळ घालून शेती केली पाहिजे. इथेनॉलचा वापर जसाजसा वाढेल तसा तेलासाठी बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांना मिळेल, हे त्यांनी दाखवून दिलं.'


पाहा व्हिडीओ : बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन



पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी आवर्जुन फडणवीस सरकारचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'विखे पाटील यांनी पाणी प्रश्नावर काम केलं. 2014 पासून याच कामाला अधिक गती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची ओळखचं पाणी प्रश्नांसंदर्भातील आहे. तसेच गावं आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न विखे पाटील यांनी केला. तसेच विखे पाटील यांच्या सर्व पिढ्या अधिक सक्षमतेने समाजसेवा करत आहेत.'


मोदी यांनी या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील कोरोना संकटावरही भाष्य केलं. मोदी म्हणाले की, 'कोरोनाचा धोका अजून बाकी आहे. महाराष्ट्रात हा धोका अधिक आहे. म्हणूनच नागरिकांनी हलगर्जीपणा करू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. तोंडाला मास्क लावा, वारंवार हात स्वच्छ करा.'


दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 'अटल बिहारी सरकारच्या काळात काम करण्याची संधी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाली. त्यामुळेच उद्धव ठाकरे आजच्या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित आहेत.'


काँगेसमध्ये कोंडल्या गेलेल्या हिऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी कोंदण दिलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


'मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, जुने ऋणानुबंध आहेत. मूर्ती छोटी पण कीर्ती महान, अजूनही समोर आहेत असंच जाणवतं. अडचणींचा सामना करत नाही तर जिद्दीने अडचणींवर मात करत पुढे येणार विखे पाटील यांचे घराणे आहे. व्यवस्थेचा दुष्काळ बाळासाहेब विखे पाटील यांनी दूर केला. एवढचं नाहीतर अश्यक्य वाटणाऱ्या गोष्टीही सत्यात आणल्या. इंदिरा निष्ठ घराणं होतं त्यांना कसे घ्यायचे? हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. काँगेसमध्ये कोंडल्या गेलेल्या हिऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी कोंदण दिलं. मला या कार्यक्रमाला नसते बोलावले, तर मी नक्की रागावलो असतो. आपण पक्ष सोडून एकत्र काम करू. पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद आपल्यावर आहेतच.' , असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.


बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीत पुस्तक प्रकाशन होणं अपेक्षित, पण दुर्देवाने तसं झालं नाही : चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटीलया कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीत पुस्तक प्रकाशन होणं अपेक्षित होतं. पण दुर्देवाने तसं झालं नाही. एका सामान्य घरात जन्माला आलेला माणूस शेतकऱ्यांसाठी कार्य करतो, त्यांना दिशा देतो. बाळासाहेबांनी कांदा, दूध यांसारख्या प्रश्नांवर लक्ष दिले. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र नवोदित तरुणांसाठी दिशादर्शक पुस्तक ठरेल.'


आत्मचरित्र नाहीतर शेती, राजकारण, समाजकारण यांसारख्या विषयांवर भाष्य करणारा ग्रंथ : देवेंद्र फडणवीस


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, 'हे आत्मचरित्र नाही तर शेती, राजकारण, समाजकारण या सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. आपल्या गरिबीचा विसर कधी त्यांनी पडू दिला नाही. जन्मभर भेदभाव न करता काम बाळासाहेब यांनी केलं. तसेच दुष्काळ मुक्तीचा प्रयत्न सुरु केला होता. 1970 साली पाणी परिषदेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एकत्र केले. पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याची भावना सर्वात प्रथम बाळासाहेब विखे यांनी मांडली. त्यामुळे जेव्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल तेव्हा त्यांच स्वप्न पूर्ण होईल.'