बेळगाव : कन्नडमधील प्रसिद्ध गीतकार के.कल्याण आणि त्यांच्या पत्नीत बेबनाव निर्माण करुन मांत्रिकाने तब्बल सहा कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याची घटना बेळगावात घडली आहे. या मांत्रिकाला माळ मारुती पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी बेळगावातील पत्रकार परिषदेत दिली.
गीतकार के कल्याण यांच्या घरी कामाला असलेल्या महिलेला हाताशी धरुन मांत्रिक शिवानंद वालीने कल्याण यांची पत्नी अश्विनी हिला तुम्हाला तुमच्या पतीपासून धोका आहे असे सांगितले. नंतर अश्विनी आणि तिच्या आई-वडिलांना वशीकरण करुन चाळीस लाख रुपये रोख, 350 ग्रॅम सोने, सहा किलो चांदी आणि विविध ठिकाणच्या मालमत्ता आपल्या नावावर करुन घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
बंगलोर येथील कल्याण यांच्या घरात कामाला असलेल्या गंगा कुलकर्णी हिला हाताशी धरुन मांत्रिक शिवानंद वालीने कार्यभाग साधला होता. यासंबंधी कल्याण यांनी माळ मारुती पोलीसात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्याची दखल घेऊन तपास करुन मांत्रिकाला गजाआड केले. चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. कल्याण यांच्या पत्नीकडून मिळवलेल्या पैशातून त्याने दहा मिनी बस देखील खरेदी केल्या होत्या. या बस पोलिसांनी जप्त केल्या आहेत.