मुंबई : अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संधी मिळणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.


थोरातांसोबतच तीन ते चार नेत्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.

याआधीच, काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी थोरातांची वर्णी लागली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने विखेंचे पक्षांतर्गत विरोधक मानले गेलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदाची माळ पडली होती. आता प्रदेशाध्यक्षपदाच्या रुपाने थोरातांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी येणार आहे.

बाळासाहेब थोरात 2009 मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात.

अहमदनगरमध्ये विखेंचे प्रतिस्पर्धी म्हणून थोरातांची ओळख राज्यभरात आहे. काँग्रेसमध्ये असतानाही विखे पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उडी घेतली होती. त्यामुळे थोरात यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रान पेटवले होते.

काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पडद्यामागे काय काय झालं?

प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांचा हायकमांडने विचार केला होता. ते म्हणजे बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील. काल या दोघांनाच बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. बाळासाहेब थोरात हे पद स्वीकारण्यास फार इच्छुक नव्हते, त्यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्याच नावाला पाठिंबा दिला होता. पण हायकमांडची इच्छा आणि पसंती बाळासाहेब थोरात यांना अधिक होती.

एकनिष्ठता या निकषावर थोरातांना झुकते माप मिळाले. हर्षवर्धन पाटील वयाने लहान, आक्रमक आणि उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे असल्याने त्यांच्याही नावावर शेवटपर्यंत विचार सुरु होता. पण थोरातांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

थोरात यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमतानाच राज्यात काँग्रेस तीन कार्यकारी प्रदेशाध्यक्षही देणार आहेत. एक मुस्लिम, एक मागासवर्गीय, आणि एक इतर जातीतून अशी रचना असणार आहे.