अहमदनगर : अहमदनगरमधील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. एकमेकांविरोधात बोलणारे हे दोन दिग्गत नेते एका लग्न समारंभात एकाच सोफ्यावर शेजारी बसलेले दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात हे नेते एकत्र आले होते आणि एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसत होते.
काँग्रेस पक्षात एकत्र काम करताना बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांनी कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण केलं. आज राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये तर बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये आहेत. दोन्ही नेते आजही एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र या दोन नेत्यांना एका लग्न सोहळ्यात चक्क शेजारी बसण्याचा प्रसंग घडला. संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाहाला दोन्ही नेते एकाच वेळी दाखल झाले आणि बाळासाहेब थोरात यांनी चक्क राधाकृष्ण विखे यांना शेजारी बसवून घेतले. लग्न समारंभात उपस्थित असताना दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं अनेकांनी पाहिलं. मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता अजून कायम आहे. राजकारणात वैरी असणारे समोर आले तर मित्रत्वाच्या नात्यानं भेटतात तसाच हा प्रसंग होता
थोरात-विखे पाटलांचे आरोप-प्रत्यारोप
दोन-तीन वर्षांपूर्वी बाळासाहेब थोरातही देखील भाजपात प्रवेश करणार होते. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले होते, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता. स्वत:चं कतृत्व काहीच नाही. अहमदनगर जिल्ह्यातील 12 पैकी तीन जागा त्यांनी लढवल्या. त्यात त्यांना कसंबसं यश मिळालं आहे. त्यामुळे थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची चिंता करु नये, असं विखेंनी म्हटलं होतं.
बाळासाहेब थोरातांचं विखे-पाटलांना प्रत्युत्तर
भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायला भेटलो होतो की, आमचे चांगले लोक तुमच्याकडे पाठवतो आणि तस घडलंही, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला. राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही. काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलोय आणि यापुढेही करत राहणार आहे. सर्वांना काही स्वभाव माहिती असतात, त्यातून काही अंदाज बांधले जातात. आता सत्ता बदलली आहे, तर कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असावी, असा टोलाही बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना लगावला.
संबंधित बातम्या
- आमचे लोक तुमच्याकडे येणार, हे सांगायला भाजप नेत्यांना भेटलो होतो; बाळासाहेब थोरातांचा विखे-पाटलांना टोला
- बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते; विखे पाटलांचा गौप्यस्फोट
- मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील