भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहे. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले होते, याची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. बाळासाहेब थोरातांना सगळं अपघातानं मिळालं आहे. त्यात त्यांचं स्वत:चं कतृत्व काहीच नाही. नगर जिल्ह्यातील 12 पैकी तीन जागा त्यांनी लढवल्या. त्यात त्यांना कसंबसं यश मिळाल्याचे विखे म्हणाले. त्यामुळे थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची चिंता करू नये. कारण, दोन-तीन वर्षांपूर्वी थोरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात होते, असा गंभीर आरोप विखे-पाटील यांनी केला आहे. विखे पाटील शिर्डीमध्ये आले असता ते बोलत होते.
मी काम केल्यानेच काँग्रेसला अच्छे दिन -
मी विरोधी पक्षनेते असताना केलेल्या कामाचा फायदा काँग्रेसला झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन आले. उलट थोरात यांनी राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप विखे पाटील यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विखे बोलत होते.
मी भाजपचा कार्यकर्ता : राधाकृष्ण विखे पाटील
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, या चर्चांना स्वत: राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण विराम दिला आहे. मी भाजपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा - मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil | बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते : राधाकृष्ण विखे पाटील | ABP Majha