शिर्डी : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र या चर्चांना स्वत: राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण विराम दिला आहे. मी भाजपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
काँग्रेसची भूमिका मी प्रभावीपणे राबवली होती. काही अडचणींमुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र भाजप सोडण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या दुर्दैवी आहेत. मी भाजपमध्येच राहणार आहे. माझी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट सुद्धा झालेली नाही, त्यामुळे अशा चर्चांमध्ये तथ्य नाही. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत आहेत. अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
कर्जमाफीतून शेतकऱ्यांची फसवणूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असताना आज शेतकरी वाऱ्यावर आहे. कर्जमाफीमध्ये अनेक अटी-शर्थी आहेत. मार्चनंतर कर्जमाफी करणार म्हणताय मग तोपर्यंत व्याज वाढणार नाही का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केला. कर्जमाफीबद्दल संभ्रमाची स्थिती आहे. कर्जमाफीबद्दल निर्णय उद्धव ठाकरे घेत नसून आता त्यांचे रिमोट कंट्रोल वेगळे आहे. शिवसेना आता आपल्या मूळ धोरणापासून दूर गेली आहे, असा टोलाही विखे पाटलांनी लगावला.
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या विखे पितापुत्रांनी पाडापाडीचं राजकारण केल्याने अहमदनगरमध्ये भाजपच्या जागा घटल्या. अशी तक्रार नगरमधल्या भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात केली होती. भाजप नेत्यांच्या तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याचं आश्वासन पक्ष नेतृत्त्वानं दिलं आहे. त्यावर बोलताना माझ्यावर आरोप करायचे असतील तर ते पक्ष नेतृत्वाकडे केले पाहिजेत. पक्ष नेतृत्वाने सर्वांना एकत्र बोलवून प्रत्येकाची बाजून ऐकूण घेतली पाहिजे. माझ्या विरोधात काही तक्रारी असतील तर प्रसारमाध्यमांऐवजी वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. आरोपांबाबत मी आजही पक्षाला उत्तर दिलं असून चौकशी अंती सर्व स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या