Balasaheb Renake On NRC : जर देशात एनआरसी (NRC) लागू झाली तर पंधरा कोटींपैकी आठ कोटी भटके विमुक्त कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये (concentration camps) जातील, असं वक्तव्य रेणके आयोगाचे अध्यक्ष भटक्या विमुक्त समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब रेणके यांनी सोलापुरात केलं आहे. सोलापुरातील ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजित ऑपरेशन परिवर्तन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी रेणके बोलत होते. 


सन्मानाने जगण्यासाठी साधन कसे मिळतील हा प्रश्न


 रेणके म्हणाले की, देशातील 54% भटक्या विमुक्तांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे एनआरसी लागू झाला तर ते त्यांचं नागरिकत्व सिद्ध करु शकणार नाहीत.  मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सांगितलं होत जर आपण 8 दिवस पारधी वस्तीवर राहिलो तर जगण्यासाठी चोरी किंवा भीक मागणार नाही तर स्वाभिमानाने मरून जातील. यात तिसरा पर्याय नाही. म्हणून इथल्या साधनविहीन समाजाला, प्रतिष्ठेने आणि सन्मानाने जगण्यासाठी साधन कसे मिळतील हा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. 


कायदा रद्द झाला मात्र सिलॅबस काही बदलला नाही


रेणके म्हणाले की, भटक्या विमुक्तांचे मुळातले प्रश्नच या लोकांना माहिती नाहीयेत.  भटक्या विमुक्तांना जन्मताच गुन्हेगार ठरविण्यात आले. मात्र त्यानंतर स्वराज्यात त्याबाबतचा कायदा रद्द केला, परंतु कागदावर तोच आहे . आजही पोलिसांना हाच कायदा शिकवला जातो, त्यामुळे कायदा रद्द झाला मात्र सिलॅबस काही बदलला नाही.  त्यामुळे पोलीस विभागातील काही अधिकारी आजही ट्रेनिंगमध्ये शिकवलेला सिलॅबसच डोक्यात घेऊन येतात, संवेदनशीलता नसलेले हेच अधिकारी भटक्या विमुक्तांना तसेच वागवतात, असंही ते म्हणाले. 


भटक्या विमुक्तांना जगण्याची संधी आजही मिळत नाही


रेणके यांनी सांगितलं की, भटके विमुक्त स्वातंत्र्यलढ्यात लढलेली माणसे आहेत त्यामुळे त्यांना जगण्याची संधी द्या.  उमाजी नाईकला जन्मताच ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवण्यात आले होते, संपूर्ण स्वातंत्र्याचा जाहीरनामा याच उमाजी नाईक यांनी तयार केला होता, नंतर भगतसिंह आणि त्यानंतर महात्मा गांधीजींनी तो घेतला. एकीकडे देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय मात्र भटक्या विमुक्तांना जगण्याची संधी आजही मिळत नाही. 


 किमान त्यांना पर्याय तरी उपलब्ध करून द्या


स्वराज्यात काय कायदे केले गेले ते पहा, राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांचे भान जाग्यावर असतेच असे नाही. भिक्षा प्रतिबंधक कायदा आणला गेला, इच्छा मारुन पिढ्या भिक्षा मागून जगणारी लोक आपल्याकडे आहेत. धार्मिक भिक्षुक, डोंबारी असे अनेक लोक आहेत, मात्र या सर्वांचे धंदे एका रात्रीत कायद्याने बेकायदेशीर ठरवले गेले, आणि तेच गुन्हेगार ठरतील.  एकीकडे भटक्या विमुक्तांकडे गायन, वादन, नृत्य असा सांस्कृतिक ठेवा आहे. अशाच गायन वादन नृत्य असणाऱ्या कलाकारांना पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार देता. गोंधळ्याच्या रथाला दिल्लीत पहिला क्रमांक मिळाला, गोंधळाचं सोंग घेणारा कलाकार टीव्हीवर येतो आणि त्याला पुरस्कार दिले जातात. मात्र खरा गोंधळी दारोदारी फिरून भीक मागतो.  हे खरं आहे की रस्त्यावर माकडं नाचवून, दोरीवर चालून आमची प्रगती होऊ शकत नाही. मात्र यातूनच आमच्या दुसऱ्या दिवशीच्या न्याहरीची सोय होते.  त्या न्याहरीची व्यवस्था केल्याशिवाय तुम्ही परंपरागत चाललेले व्यवसाय बंद करून कायद्याने तुम्ही त्यांच्या जगण्याची साधने हिसकावून घेत आहात.  किमान त्यांना पर्याय तरी उपलब्ध करून द्या, असं आवाहन रेणके यांनी केलं.