मुंबई : राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला कडवट विरोध सुरु होताच ठाकरे बंधू पुढे सरसावले आहेत. येत्या 5 जुलैला मराठी माणसांचा एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात कुणाचाही झेंडा नसला तरी तो मोर्चा मराठीत्व दाखवणारा आणि 2006 नंतर म्हणजे जवळपास 20 वर्षांनी ठाकरेंची एकत्रित शक्ती दाखवणारा असणार आहे. मराठीत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरेंची शेवटची इच्छा काय होती याचीही माहिती दिली.  एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ठाकरे बंधुंचे दोन शिलेदार, बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

Continues below advertisement


Bala Nandgaonkar : बाळा नांदगावकरांनी सांगितली शेवटची आठवण


ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. 2017 साली बाळा नांदगावकर माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत भावुक झाले होते. 


बाळा नांदगावकर म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी आपली आठवण काढली होती. पक्ष वेगळा असतानाही, आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही बाळासाहेबांनी आपली आठवण काढली हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आमची 12 मिनिटे चर्चा झाली. शेवटी जाताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, बाळा... राज आणि उद्धव एकत्र आले तर बरे होईल."


Bala Nandgaonkar Majha Katta : बाळासाहेबांना शब्द दिला


बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, "त्यावेळी आपण बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्यामुळेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन बंधू एकत्र आल्यानंतर माझं राजकारण संपलं तरी चालेल पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र यायला हवं."


हिंदीच्या सक्तीवर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, "या आधीची परकीय आक्रमणं हे फक्त भूमीवर झाले नाहीत. परकियांनी भाषेवर आक्रमण केलं आणि नंतर ती संस्कृती संपवली. आताही तोच छुपा अजेंडा आहे. हिंदीच्या नावाखाली मराठी संस्कृती संपवण्याचा डाव आहे."


MNS Shiv Sena Morcha Mumbai : ठाकरे बंधुंचा मोर्चा भव्यदिव्य असणार


हिंदीच्या मुदद्यावरचा येत्या 5 तारखेचा मोर्चा यशस्वी आणि भव्यदिव्य करण्यासाठी ठाकरेंची ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. मोर्चाची रुपरेषा ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. त्यासाठी दोन्हीकडच्या काही नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. मोर्चाची वेळ, ठिकाण आणि मार्ग याबाबत चर्चा सुरू आहे. 5 तारखेचा मोर्चा भव्यदिव्य असेल, असं अनिल परब यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितलंय. असा मोर्चा भाजपलाही काढता येणार नाही, असं ते म्हणाले. 


ही बातमी वाचा :