Bakri Eid 2022 : देशभरात आज ईद-उल-अझा म्हणजेच बकरी ईदचा (Bakra Eid) सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून विविध उपक्रम देखील राबवले जातात. पुणे येथील पैगंबर शेख या तरूणाने देखील असाच एक अनोखा उपक्रम राबवला आहे. गेल्या नऊ वर्षांपासू पैगंबर शेख हे आर्थिक कुर्बानीचा उपक्रम राबवतात. या उपक्रमातून एक हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे. शिवाय नैसर्गीक आपत्तीच्यावेळी देखील नुकसानग्रस्तांना मदत केली जाते.
मशिद, मदरसा मधील विद्यार्थी, अनाथ आश्रमांना कुर्बानीच्या पैशातून मदत करण्यापासून शेख यांचा प्रवास सुरू झाला. कुर्बानीच्या पैशातून शेख यांनी केरळ मधील पूरग्रस्तांना मदत केली. कोल्हापूर, सांगलीमध्ये पुरग्रस्तांना मदत दिली. याबरोबरच 2019 मध्ये सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातील तब्बल 500 पेक्षा जास्त पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्य किटचे वाटप केले. भिलवडीतील 150 विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देखील आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
पैगंबर शेख यांच्याकडून गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी आर्थिक कुर्बानीचा उपक्रम राबवला जात आहे. या कुर्बानीतून आतापर्यंत जवळपास एक हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध पद्धतीने मदत करण्यात आली आहे.
यवतमाळ मधील आदिवासी भागात ज्या ठिकाणी मुलांना नीटपणे कपडे ही घालायला मिळत नाहीत अशा ठिकाणी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यात आले. उर्दु माध्यमातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना वर्षभराच्या वह्या आणि जर्नल, मराठी माध्यमातील 40 विद्यार्थी बसणाऱ्या खोलीचे फरशी काम, शिवाय साताऱ्यातील जिजाऊ वसतिगृह मधील 40 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
या वर्षी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आजपर्यंत जवळपास दीड लाख रुपये जमा झालेले आहेत. यावर्षीची कामे लवकरच आपल्या सर्वांसमोर येतील, अशी माहिती पैगंबर शेख यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.
कशी राबवली जाते आर्थिक कुर्बानी?
बकरी ईद साजरी करण्यासाठी प्राण्याची कुर्बानी दिली जाते. परंतु, हा प्राणी खेरीदी करण्यासाठी जी रक्कम वापरली जाते, तीच रक्कम प्राणी खरेदी न करता आर्थिक कुर्बानी या उपक्रमासाठी जमा केली जाते. अनेक मुस्लिम बांधव प्राण्याची कुर्बानी देण्याऐवजी ती रक्कम या उपक्रमात सढळ हाताने जमा करतात. अशी जमा झालेली ही रक्कम शिक्षणासहनुकसान ग्रस्तांना मदत करण्यासाठी वापली जाते.