गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आजही विकास किती कोसोदूर आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. नक्षलग्रस्त दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या तुरेमर्का गावातील ही घटना आहे. प्रसुतीसाठी एका गरोदर मातेला नदीनाल्यातून तब्बल 23 किमी पायपीट करावी लागली. यावेळी महिलेसोबत आशा वर्करही होती. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला.


रोशनी पोदाटी असं या महिलेचं नाव आहे. तुरेमर्का गावात नीट रस्ता नाही. अनेक नदी नाले वाटेत पडतात, त्यावर पूल नाही, घनदाट जंगल, आरोग्य सेवेचा अभाव आणि त्यात पावसाचे दिवस असल्याने स्थिती भयावह असते. देश स्वतंत्र्य झाल्यानंतरही या भागाची अवस्था अशीच आहेत.



गावात आरोग्य सेवा नसल्याने प्रसुतीसाठी तिला प्रवास करणे गरजेचं होतं. त्यामुळे या गरोदर मातेने आशा सेविकेच्या मदतीने नदीनाल्याच्या प्रवाहातून मार्ग काढून तब्बल 23 किलोमीटर पायपीट केली आणि दोघी लाहेरी गावापर्यंत पोहोचल्या. इथे ही महिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली, मात्र पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने तिला रुग्णवाहिकेने ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. डॉ अनघा आमटे यांनी तिची यशस्वी प्रसुती केली आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला.


देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाली आहेत. आजचं जग विज्ञानाचं आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात आजही अनेक दुर्गम भागांची अवस्था अशीच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावात वीज नाही, रस्ते नाही, आरोग्याची व्यवस्थित सुविधा नाही. दुर्गम भागात विकास होत असल्याचा दावा होत असला तरी वास्तवात विकास कागदावरच धूळ खात आहेत. आजही या भागाचा विकास जैसे थे आहे. रुग्णांना अजूनही खाटेवर आणावं लागतं तर काहींना अशा परिस्थितीतही पायपीट करावी लागते.