सिंधुदुर्ग : उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे.

दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करु, अशी हमी देखील द्यावी लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांकडे बोट दाखवत नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडेंसह 17 समर्थकांनी अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. याप्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणेंसह 19 जणांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती.

नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी (4 जूलै) मुंबई-गोवा महामार्ग उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल ओतला होता. त्यानंतर रात्री नितेश आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.