पिंपरी : कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पिंपरीतल्या पिक विमा कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'दोन मुलं उठली, म्हणून मीडिया धावली, कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते' असं वक्तव्य बोंडे यांनी केलं.


पिंपरीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत गोंधळ झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाषण करत असताना पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा काही जणांनी दिल्या. घोषणा देणारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दुष्काळग्रस्त शेतकरी असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत त्रुटी असल्याची कबुली खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. विमा कंपन्या आणि बँका विमा योजनेसाठी हातभार लावत नसल्याने यात शेतकरी भरडला जातो. पण ही योजना चांगलीच आहे, असं खोत म्हणाले होते.

पूजा झोळे (करमाळा), अजिंक्य नागटिळक (पंढरपूर), सौरभ वळवडे (सांगली) आणि सूरज पंडित (परभणी) यांनी कार्यशाळेत गोंधळ घातला. मीडियाने त्यांच्या आवाजाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला.

यावर प्रतिक्रिया देताना बोंडे म्हणाले, दोन मुलं उठले म्हणून मीडिया धावली. कुठेही घाण पडलेली असली की माशी धावतात. आपल्याला मिठाईकडे जायचंय, घाणीकडे नाही, अशा शब्दात अनिल बोंडेंनी प्रसारमाध्यमांवर ताशेरे ओढले.