चंद्रपूर : चंद्रपुरात गुप्तधनासाठी एका सुशिक्षित कुटुंबाने नवविवाहितेचा 50 दिवस छळ केल्याचं समोर आलं आहे. गुप्तधनाच्या लोभापायी चिमूर तालुक्यातील कारेकर कुटुंबातून अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आला आहे. सतत 50 दिवस उपासमार, मारझोड अशा प्रकारचे अघोरी प्रकार नवविवाहितेबरोबर केल्याचं समोर आलं आहे.

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला मध्यरात्री उठवून घरासमोरील दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला मुरमुरे भरवायला सांगितले होते. शिवाय त्याला अंगोळ घालून त्याची पूजा करायला सांगितले. हे सगळं केल्यानं दर्ग्याखाली असलेलं गुप्तधन आपोआप वरती येईल अशी चंद्रपुरातील कारेकर कुटुंबाची अंधश्रद्धा होती, म्हणूनच हा सगळा प्रकार सुरु होता. या अघोरी प्रकार करण्यासाठी कारेकर कुटुंबीयांनी नववधूला दिवसभर उपाशी ठेवलं हे सर्व 50 दिवस सुरु होतं.

चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावातील समीर गुणवंत कारेकर या मुलाशी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या या मुलीचं ऑगस्ट 2018 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहिता नवविवाहितेला रात्री अडीच वाजता उठून घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता आणि दर्गा धुण्यास सांगण्यात आले. याच दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला अंघोळ घालून पूजा अर्चना करत सुमारे दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगण्यात आले. याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला आणि त्याने हळद सुटण्याच्या आधीच नवविवाहितेला बेदम मारहाण,चटके देण्यास सुरुवात केली. या कृत्यात सासू-सासरे देखील सहभागी झाले होते.



कारेकर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत असल्याने आत सुरु असलेल्या प्रकाराबाबत शेजारी अनभिज्ञ राहिले. याशिवाय सूर्योदय ते सूर्यास्त या काळात नवविवाहितेला उपाशी ठेवून हे कृत्य करायचे असल्याने पहिल्या दिवसापासूनच सविताची उपासमार केली गेली.

पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल यासाठी हा प्रकार सतत सुरु राहिला. या दरम्यान नवविवाहितेकडील मोबाईल देखील काढून घेण्यात आल्याने तिचा माहेरशी संवाद संपला होत नव्हता. या दरम्यान नवविवाहितेला समीरचे आपल्यासोबतचे तिसरे लग्न असल्याची धक्कादायक माहिती देखील मिळाली. या छळाची वार्ता नवविवाहितेच्या वडिलांपर्यंत पोचल्यावर त्यांनी कारेकर यांचे घर गाठत  मुलीला माहेरी नेले.

या संपूर्ण प्रकरणाविषयी नवविवाहितेच्या वडिलांनी पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली. मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळाल्याने नवविवाहितेच्या कुटुंबाने धडा शिकविण्यासाठी पुढे आले. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली. नववधूच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी अंनिसच्या माध्यामातून प्रकरणाला वाचा फोडली आणि सासू सासऱ्यासह नवरा समीर कारेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.