Badlapur School Case : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे. सर्वजण रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको निदर्शने केली. रेल्वे रुळांवर जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या. बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. 


आता बदलापुरात आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली आहे. माध्यमे आणि पोलिसांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. हा खटला जलदगतीने चालवला जाईल आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा, असेही शिंदे म्हणाले.


बदलापूर घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकारी करणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेची एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने तपास करण्यासाठी महानिरीक्षक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आरती सिंह यांची नियुक्ती केली आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. आम्हाला या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करायचे आहे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी न्यायचा आहे.


एफआयआरमध्ये झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित


त्याच वेळी, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केला आहे. NCPCR चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सोशल मीडियावर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या पालकांना 12 तास का थांबवले, असा सवाल त्यांनी केला.


उज्वल निकम विशेष सरकारी वकील 


बदलापूर प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या