ठाणे : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या ठिकाणी हजारो आंदोलक उपस्थित होते. त्यांना पांगवण्यासाठी आता पोलिसांनी लाठीचार्ज केला. तब्बल 12 तासांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी साडे सहा पासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता.


राज्य सरकारच्या मध्यस्थीला यश नाही 


आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलिसांनी आवाहन केलं होतं. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला. 


त्यामुळे अखेर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं. यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही पोलिस यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून जरी आंदोलकांना पांगवलं असलं तरी आजूबाजूच्या परिसरातून हे आंदोलक दगडफेक करत असल्याची माहिती आहे. 


Badlapur School Girls Sexually Abused : नेमकी घटना काय?


बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची सफाई कर्मचारी नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं. 


घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं. ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. 


पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.



ही बातमी वाचा: