मुंबई :  बदलापूर अत्याचार (Badlapur School Abuse Case)  प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेची (Akshay Shinde)  रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.  खरं तर अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अक्षय शिंदे वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही. हा मोबाईल हस्तगत करण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अक्षयला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने अक्षय शिंदेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता अक्षयचा मोबाईल शोधण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय. एसआयटी प्रमुख आरती सिंह बदलापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.


आरोपी अक्षय शिंदे वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही हा मोबाईल हस्तगत करण्यासाठी  SIT  ने न्यायालयाकडे आरोपी अक्षय शिंदेंची  पाच दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली असून अक्षय शिंदे याला SIT  ने अक्षय वावरत असलेल्या बदलापूर मधील वेगवेगळ्या भागात फिरवले असून अक्षयने मोबाईल नेमका कुठे टाकला याचा तपास केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे 


बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासन मोकाट


अक्षय  शिंदे याच्यासोबतच या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आदेशानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप संस्थाचालक फरार असून पोलिसांच्या ते हाती लागलेले नाहीत. आंदोलन कर्त्यांवर ज्या तत्परतेने कारवाई करण्यात येत आहे तीच तत्परता पोलिस प्रशासनाने संस्थाचालकांना अटक करण्यात दाखवावी अशी मागणी बदलापूरकर करत आहेत.


एसआयटी प्रमुख आरती सिंह बदलापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून


 मुंबईसह राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर शाळकरी मुलींच्या अत्याचार प्रकरणी तपासासाठी राज्याच्या गृहखात्याने  SIT स्थापन केली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही  SIT स्थापन करण्यात आली आहे.  या प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी स्वत: आरती सिंह  लक्ष घालत असून पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या आहेत. 


हे ही वाचा :


Badlapur School Case Exclusive: 'ती झोपतून उठते रडायला लागते अन् म्हणते...', बदलापूरमधील त्या घटनेचे चिमुकलीच्या मनावर तीव्र आघात