बदलापूर: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्य नाही तर संपुर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट दिसून येत आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यानंतर पोलीस प्रशासनाची दिरंगाई आणि संशयास्पद कारभार यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलत प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. मात्र, या घटनेचे तीव्र आघात आणि भीती त्या चिमुकल्या मनावर बसले आहेत. ती आजही त्या घटनेने अस्वस्थ आहे. त्या चिमुकलीच्या आई- वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना त्या संतापजनक घटनेबाबत धक्कादायक गोष्टी समोर सांगितल्या आहेत.
ती झोपेतून दचकून जागी होते अन्...
पिडित मुलीच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आमच्यावर इतकं मेंटल प्रेशर आहे, आम्ही आमच्या मुलीला ते दाखवू शकत नाही. यातून तिला जमेल तितकं आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. ती झोपते, काही वेळा झोपेतून दचकून जागी होते. मला या शाळेत जायचं नाही, मला दुसऱ्या शाळेत जायचं असंही ती म्हणते.
शाळेतील सर्व मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे
आमची मुलगी व्यवस्थित राहिली पाहिजे, इतकीच आमची अपेक्षा आहे. त्या शाळेतील सर्व मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली.
शाळा प्रशासनाची मुजोरी
मुलीचे पालक या सगळ्यानंतर शाळेत गेले तेव्हा मुख्याधापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही. आम्ही शाळेत पुरुष कामाला ठेवलेच नाहीत. पण आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हा तिकडे पुरुष दिसत होते. 10-15 मिनिटांनी त्यांनी विषय बदलला. आमच्या शाळेतील सीसीटीव्ही सुरु आहेत, पण रेकॉर्डिंग होत नाही, असे शाळेतून सांगण्यात आल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.
नेमकं काय घडलं?
मुलीच्या आईने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, माझ्या मुलीबरोबरची शाळेतील मैत्रीण आहे. तिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. पण तिला ताप आल्याचे कारण देत ती शाळेत येत नव्हती. 13 तारखेला ती शाळेत गेली नव्हती. माझी मुलगी त्यादिवशी शाळेत गेली होती. शाळा सुरु झाल्यावर मला काहीवेळाने शिक्षकांचा फोन आला. तुमची मुलगी खूप रडतेय, काही केल्या ती रडायची थांबत नाही. तुम्ही तिला शाळेत घ्यायला या, असे शिक्षकांनी मला सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करुन तिला शाळेत जायला सांगितले. मला परत मॅडमचा फोन आला, ती रडायची थांबत नाही. कान दुखतोय, असे सांगतेय. तोपर्यंत माझे वडील शाळेत पोहोचले. त्यांच्याबरोबर माझी मुलगी वर्गातून बाहेर पडली. ती माझ्या वडिलांचा हात धरून चालत होती. तिची पावलं वाकडीतिकडी पडत होती. ती शाळेत होताना व्यवस्थित होती, पण आता वाकडीतिकडी चालते, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आले. तिला घरी गेल्यावर ताप आला. 14 तारखेला आम्ही तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला.
तेव्हा माझ्या पतींना शंका आली. ते आमच्या मुलीला घेऊन 15 तारखेला डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टची तपासणी करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. घरी आल्यावर आम्ही मुलीला विचारलं तेव्हा शाळेतला दादा, गुदगुदल्या करतो, असे तिने सांगितले. आम्ही दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केला. त्यांनी माझी मुलगी रात्री बडबडते, झोपेत हातवारे करते, असे सांगितली. आम्ही आपण पोलिसांत जाऊ, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. तेव्हा दुसऱ्या मुलीच्या पालकांनी सांगितले की, मी शाळेत गेलो होतो, मात्र त्यांनी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. एवढी मोठी शाळा आहे, आपण त्यांचं काय वाकडं करणार, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आम्ही मनसेच्या स्थानिक नेत्यांकडे गेलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर 16 तारखेला आम्ही पोलीस ठाण्यात गेल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात काय घडलं?
आम्ही 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचलो. आम्हाला शाळेविरुद्ध तक्रार करायची आहे, असे सांगितले. मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तेथील पोलीस अधिकारी शितोळे मॅडमने माझ्या मुलीची चौकशी करायला सुरुवात केली. तुझं नाव काय, तू कुठे राहते, हे विचारलं. मात्र, त्यानंतर माझी मुलगी गप्प बसली. त्यांच्या पोलिसी गणवेशाला घाबरुन ती काही बोलत नव्हती. अखेर शितोळे मॅडम साधे कपडे घालून आल्या. त्यावेळी माझ्या मुलीने त्यांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मी शाळेच्या स्वच्छतागृहात जाते, तिकडे एक दादा असतो. तो गुदगुदल्या करतो. त्याने मला मारलंदेखील होतं. तिने सगळा प्रकार सांगितला. ज्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, त्यांचं नाव तिला माहिती नव्हते. ती त्याला काठीवाला दादा म्हणून ओळखायची. त्याने एकदा मला कानाखालीही मारली होती, असे मुलीने सांगितले. आम्ही पोलिसांना खासगी रुग्णालयातील मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा रिपोर्ट पोलिसांना दाखवला.
मात्र, पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करुन घेतली नाही. त्यांनी शाळेच्या मुख्याधापकांना फोन केला. त्यानंतर शितोळ मॅडम म्हणाल्या की, मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सायकल चालवल्यामुळे इजा झाली असेल. शाळेतून तसे सांगितले जात आहे. शितोळे मॅडमनी आमच्याकडील मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवला नाही. त्या माझ्या मुलीच्या सांगण्यावरही विश्वास ठेवत नव्हत्या. आमच्याकडे सायकलच नव्हती तर मुलीला त्यामुळे इजा कशी होणार? हे सगळं रात्री ९ वाजेपर्यंत सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करु घेतला, असे मुलीच्या आईने सांगितले.
मेडिकल टेस्टवेळी काय-काय घडलं?
तब्बल 9 तासांनी गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर रात्री साडेबाराला शितोळे मॅडमनी आपल्याला मेडिकल चाचणीसाठी रुग्णालयात जायचे आहे, असे सांगितले. आम्ही बदलापूर ग्रामीण रुग्णालयात गेलो. तिकडे मेडिकलची सुविधा नव्हती. मग आम्ही पावणेदोनला पुन्हा पोलीस ठाण्यात आलो. त्यानंतर शितोळे मॅडमनी आम्हाला उल्हासनगरच्या रुग्णालयात नेले. तिकडे पेपरवर्क होईपर्यंत आम्ही चार वाजेपर्यंत बसून होतो. त्यांनी मुलीसोबत काय घडलं, हे माझ्याकडून विचारून घेतलं. मुलीला प्रश्न विचारले, पण ती काही बोलली नाही, असे मुलीच्या पालकांनी सांगितले.
शाळा प्रशासनाची मुजोरी
मुलीचे पालक या सगळ्यानंतर शाळेत गेले तेव्हा मुख्याधापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही. आम्ही शाळेत पुरुष कामाला ठेवलेच नाहीत. पण आम्ही शाळेत गेलो होतो तेव्हा तिकडे पुरुष दिसत होते. 10-15 मिनिटांनी त्यांनी विषय बदलला. आमच्या शाळेतील सीसीटीव्ही सुरु आहेत, पण रेकॉर्डिंग होत नाही, असे शाळेतून सांगण्यात आल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.
VIDEO - Badlapur Minor Family : चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं? मुर्दाड पोलीसांचा पंचनामा 'माझा'वर EXCLUSIVE