अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू.. राज्यभरात बच्चू कडूंची ओळख ही 'आंदोलक' अन् 'डॅशिंग' राजकारणी अशी. त्यांच्या कामाची पद्धतही राजकुमारच्या एका चित्रपटातील डायलॉग सारखी. "पहिले बात, फिर मुलाकात और बाद मे सिधी लात" अशी. त्यांनी आपल्या 'प्रहार' संघटनेच्या माध्यमातून केलेली आंदोलनं राज्य अन् देशभरात गाजलीत. सोबतच त्यांनी अनेकदा अधिकारी- कर्मचाऱ्यांना आपल्या 'जादूच्या झप्पी'चा 'प्रसाद'ही दिला. मात्र, आक्रमक अन् लढवय्ये बच्चूभाऊ तीन पक्षांच्या 'महाआघाडी' सरकारमध्ये राज्यमंत्री झालेत अन् 'प्रोटोकॉल'च्या धबडग्यात बच्चूभाऊचा 'झप्पी'वाला अवतार महाराष्ट्रानं अनेक दिवसांपासून पाहिला नव्हता. मात्र, काल अकोला जिल्हा रूग्णालयात बच्चूभाऊंना मेसचा कारभार पाहून संताप आला अन् रागावलेल्या बच्चूभाऊंनी थेट कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली. या प्रकारानंतर गेल्या कित्येक दिवसानंतर जनतेला बच्चू कडू यांच्यामधला जूना आक्रमक बच्चू कडू दिसल्याची प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटतांना दिसते आहे. 


नेमकी काय आहे घटना?
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू काल सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर बच्चू कडू जिल्हा रूग्णालयात तेथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेलेत. जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याचे व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी 'व्हायरल' झाले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट रूग्णालयातील मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. रूग्णालयातील मेसची जबाबदारी साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर याच मेसमध्ये सुनिल मोरे हा कंत्राटी स्वयंपाकी आहे. यावेळी बच्चू कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी 23 किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. यानंतर डाळींच्या एका दिवशी 12-13 किलोचा अपहार होत असल्याचं कडू यांच्या लक्षात आल्यानं त्यांचा पारा चढला अन् त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. पालकमंत्र्यांच्या या रूद्रावतारानं मोरेसह उपस्थित सर्वच स्तब्ध होऊन गेलेत. 


मेस प्रमुख साहेबराव कुळमेथेच्या कामाची चौकशी होण्याची गरज : 


जिल्हा रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी आलेल्या धान्याची गेल्या आठ  महिन्यांपासून नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काल पालकमंत्री मेसमध्ये गेल्यावर त्यांना आणखी एक बाब लक्षात आली. येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून फक्त आठ दिवसाचेच धान्य पुरविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी कडू यांनी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांच्याकडे सोपविली आहे. या प्रकरणात निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा रूग्णालयातील मेसमधील या अपहारामागे मेस प्रमुख साहेबराव कुळमेथेच जबाबदार आहे. मात्र, रूग्णालयातील काही वरिष्ठांचा त्याच्यामागे वरदहस्त असल्याने हे वरिष्ठही पालकमंत्र्यांना शोधावे लागणार आहेत. 



आतापर्यंत अनेकांना मिळाली बच्चू कडूंची 'जादू की झप्पी' :
बच्चू कडू यांनी आंदोलनादरम्यान अनेकदा मारहाण केल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यांनी मारहाण आणि रौद्राताराचा फटका आयएएस, आयपीएस, उपसचिव आणि अनेक कर्मचाऱ्यांना बसला आहे.  बच्चू कडू यांनी 29 मार्च 2016 रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली होती. या मारहाणीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडूंच्या अटकेसाठी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर अखेर बच्चू कडू यांना अखेर 30 मार्च 2016 ला रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली होती.


यासोबतच बच्चू कडू 2017 मध्ये बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाणीचा प्रयत्न केली होती. मात्र, सुरक्षा रक्षकांमुळे ही मारहाण थोडक्यात टळली होती. अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कडू यांनी नाशिक महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. यासोबतच बच्चू कडू कडू यांनी अकोला येथील आरोग्य विभागाच्या विभागीय कार्यालयातील एका लिपिकालाही दिव्यांगाना त्रास देत असल्याने चोप दिला होता. कडू यांच्या मारहाणीची आणखीही बरीच उदाहरणे आहेत. 


बच्चू कडू यांची गाजलेली आंदोलनं : 
बच्चू कडू महाराष्ट्रात त्यांच्या अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने दिव्यांग, रूग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांसाठी असतात. अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून त्याकडे लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्रसंगी कायदा हातात घेऊनही त्यांनी आंदोलने केली आहेत. यातीलच ही काही महत्वाची आंदोलनं... 


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं "शोले" स्टाईल आंदोलन राज्यभर गाजले. सरकारच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि वित्त व योजना राज्यमंत्री सुनील देशमुख यांनीही टाकीवर चढूनच त्यांच्याशी चर्चा करुन 75 मागण्या मान्य केल्या होत्या. 


आदिवासी बांधव परंपरेने कसत असणारी शेतजमीन त्यांच्या नावे करण्याच्या शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरुन त्यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत स्वतःला त्या शेतजमिनीत गळ्यापर्यंत गढून घेण्याचे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच आदिवासी समाजाच्या वनपट्टे मिळण्याच्या मागणीबाबत वनाधिकारी दुजाभाव करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याच्या घरात "साप छोडो" आंदोलन करण्याची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी आदिवासींना वनपट्टे मंजूर झाले.


खेड्यापाड्यातुन तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या लोकांना अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने लोकांचा खोळंबा व्हायचा. बच्चुभाऊंना हा विषय समजताच त्यांनी "अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव" आंदोलन केले. त्यातून आलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली. परिणामी अधिकारी कार्यालयीन वेळेत लोकांची कामे करण्यासाठी उपस्थित राहू लागले.


अचलपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरून बच्चू कडूंनी रुग्णालय परिसरात झाडाला स्वतःला उलटे टांगून घेत आंदोलन केले. ते पाहून आरोग्य विभागाने त्वरित रुग्णांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी हालचाल सुरु केली.


2004-05 च्या दुष्काळात दुष्काळग्रस्तांना शासकीय मदत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी तहसील कार्यालयातच गणपती स्थापन करुन जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत या गणपतीचे विसर्जन करणार नाही अशी घोषणा केली. ते "गणपती आंदोलन" पाहून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.


शहरी भागात अखंड वीजपुरवठा आणि ग्रामीण भागात भारनियमन या दुजाभावाच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी अमरावती वीज महामंडळाच्या कार्यालयाबाहेर "रुमणं" आंदोलन केले. त्यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली. कार्यकर्ते जखमी झाले. ऊर्जामंत्र्यांनी याची तात्काळ दखल भारनियमन दोन तासांनी कमी करण्याचे आदेश दिले.


कापसाची बिले द्यायला शासन उशीर करत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी "सामूहिक मुंडन" आंदोलन केले, परिणामी शेतकऱ्यांना त्वरित कापसाची बिले देण्याचे आदेश देण्यात आले होते.


दारु बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर "दूध वाटप आंदोलन" केले. 
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेतील तमाशा आणि त्याआडून होणार देहविक्रीचा व्यवसाय बंद पाडण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. प्रचंड मोठा विरोध पत्करून त्यांनी त्या यात्रेतील तमाशा, दारूविक्री, देहविक्री बंद पाडून दाखवली.


एप्रिल 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावावरून म्हणजे नागपूर  येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर गावापर्यंत काढलेली 'आसुड यात्रा' खूप गाजली. गुजरातच्या सीमेवर ही यात्रा अडवण्यात आल्यानंतर बच्चुभाऊंनी वेषांतर करुन गुजरातमध्ये प्रवेश मिळवला. मोदींच्या वडनगर या गावी जाऊन त्यांनी रक्तदान केले.