अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 'जास्त उडउड करू नका, तुला ही केजरीवालसारखं जेलमध्ये टाकू नाहीतर उडवून टाकू' अशी चिठ्ठी लिहून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना धमकी दिली आहे. भाषणासाठी जाताना त्यांना गर्दीतून कुणीतरी चिठ्ठी दिली, त्या माध्यमातून ही धमकी दिल्याचं आमदार बच्चू कडू यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमदार बच्चू कडू यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी?
बुधवारी एका सभेत जाण्यापूर्वी कोणीतरी गर्दीतून आलं आणि एक चिठ्ठी दिली. ती वाचल्यावर लक्षात आलं की ही धमकी आहे अशी माहिती स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला फोनवर दिली. 'जास्त उडउड करू नका, तुला ही केजरीवालसारखं जेलमध्ये टाकू नाहीतर उडवून टाकू' असं त्या चिठ्ठीत लिहिलं असल्याचं बच्चू कडूंनी माहिती दिली.
त्यानंतर अमरावतीमध्ये झालेल्या जाहीर भाषणात बच्चू कडूंनी आपल्याला धमकी आल्याचं सांगितलं. अमरावती येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यतिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बच्चू कडूंच्या प्रहारचे दिनेश बूब अमरावतीच्या रिंगणात
बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध करत त्या ठिकाणी प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष सुरू आहे. त्याचमुळे बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध करत आपला उमेदवार जाहीर केला आहे.
दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले आहे. तसेच अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हेदेखील इच्छुक होते. पण ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळदेखील नाराज आहेत. अभिजित अडसूळे यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
नवनीत राणांचा दोन लाखांनी पराभव करणार
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यावर बच्चू कडू यांनी नकार दिला. महायुतीच्या नेत्यांनीही बच्चू कडू यांनी राणांना मदत करावी असं सांगितलं होतं. पण अमरावती सोडून राज्यातील इतर सर्व ठिकाणी चर्चा होऊ शकते असं सांगत बच्चू कडू यांनी या ठिकाणी माघार घेणार नसल्याचं सांगितल.
आता तीर सुटला आहे, तो मागे येणार नाही असं सांगत नवनीत राणा यांचा दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी दिलं होतं.
ही बातमी वाचा: